कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्यामुळे शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गंगावेश येथून सुरु झालेला हा मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिकेसमोर पोहचला. त्याठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.
मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी आक्रमक भाषण करताना फेरीवाल्यांना हात लावाल तर उखडून टाकण्यात येईल, असा इशारा दिला. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करताच जर बेकायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर फौजदार गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.मोर्चाच्या सामोरे जाऊन अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, धनाजी दळवी, किशोर घाडगे, रघुनाथ टिपुगडे, दिपक गौड यांनी केले. मार्चात शिवसैनिकांसह फेरीवालेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत कारवाई थांबवाफेरीवाल्यांचे शिष्टमंडळ महापौर सरिता मोरे यांना भेटले. महापौर मोरे यांनी स्थायी समितीच्या सभागृहात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरीक्त आयुक्त पाटणकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, चारही विभागीय कार्यालयाचे प्रमुख, अतिक्र मण विभाग प्रमुख पंडीत पोवार यांची एक संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबबवावे, समिती स्थापन करावी, झोन निश्चित करावे अशा मागण्या केल्या.
त्यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यानंतर फेरीवाल्यांचे प्रतिनिधी समितीवर घेण्यात येतीत. झोन निश्चिती करण्यात येईल अशी ग्वाही दिली. जे विक्रेते किंवा फेरीवाले वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने रस्त्यावर असतील त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल आणि आमची कारवाई अशाच फेरीवाल्यांवर सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.