लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने सुरू केलेल्या ‘वॉररूम’कडे कोरोना संसर्गाच्या काळात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेवेळी सर्वाधिक विचारणा झाली. दुसऱ्या लाटेत ‘वॉररूम’ला ५१८४ कॉल आले, तर ३७७८ रुग्णांना त्याचा उपयोग झाला. कोरोनाने गर्भगळीत झालेले कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या वॉररूमचा मोठा आधार तर मिळालाच, शिवाय उपचाराच्या बिलावरून होणारी लूट थांबण्यासही बरीच मदत झाली.
काेरोना झाल्याचा अहवाल मिळताच नागरिकांची भीतीने गाळण उडत असायची, अशावेळी कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हायचे, तेथे बेड मिळेल की नाही, याची धास्ती वाटायची. परंतु महानगरपालिका प्रशासनाच्या ‘वॉररूम’ने अशा अडचणीच्या काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. या वॉररूममुळे रुग्णांची बेडसाठी होणारी धावपळ सुध्दा कमी झाली.
‘वॉररूम’मधून आधी रुग्णाची माहिती घेतली जाते. लक्षणे सौम्य आहेत की तीव्र स्वरूपाची आहेत याची विचारणा करून रुग्णाला त्याच्या घराशेजारील रुग्णालयात बेड उपलब्ध असल्याची खात्री करून घेऊन तेथे जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे नातेवाईकांवरील ताण-तणाव निम्मा कमी होतो. बिलाच्या बाबतीतही योग्य मार्गदर्शन केले जात होते. बिले ऑडिट करण्याकरिता संबंधित रुग्णालयाकरिता नियुक्त केलेले ऑडिटर यांचे नाव व माेबाईल क्रमांक दिले जातात. नातेवाईकांची वेळेची बचत तर होतेच, शिवाय अवाच्या सवा बिल देण्याचा आग्रह सुध्दा बंद झाला.
कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या ‘वॉररूम’चे चोवीस तास काम चालत असून त्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त निखिल मोरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. मोरे रोज या ‘वॉररूम’चा आढावा घेतात. योग्य मार्गदर्शन, माहिती दिली जात असल्यामुळे नातेवाईकांना त्याचा मोठा दिलासा मिळला आहे.
तारीख कॉल्स रुग्णांसाठी कॉल्स
१ मे १५०० ९७०
१५ मे ९७६ ९००
१ जून ११०० ९१७
१५ जून ९८८ ६५४
२० जून. ६२० ३३७
- पहिल्या लाटेत आलेले एकूण कॉल्स -. साधारणपणे २०६
- दुसऱ्या लाटेत आलेले कॉल्स - ५१८४
- वॉररूमचा आधार मिळालेले रुग्ण - ३७७८
- हेल्पलाईनवर विचारले जाणारे प्रश्न -
१) ऑक्सिजन बेडसाठी विचारणा
२) व्हेंटिलेटर बेडसाठी विचारणा
३) म्युकरमायकोसिस पेशंटकरिता बेडची विचारणा
४) बिलाचे ऑडिटबद्दल विचारणा
५) लसीकरणासंदर्भात विचारणा
६) प्रभाग समिती सचिवांकडून प्रभागातील पेशंटला शिफ्ट करण्याबाबत विचारणा
७) पासबद्दल विचारणा