जिल्ह्यात १३ पैकी चार प्रयोगशाळा शासकीय आहेत. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेचा समावेश आहे. या प्रयोगशाळेने २६ एप्रिल २०२१ पर्यंत २ लाख ८३ हजार ४८० नागरिकांचे स्वॅब तपासले. त्यातून २८ हजार १३५ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. हे प्रमाण ९.९ टक्के आहे. इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत १३ हजार ३२१ स्वॅब तपासण्यात आले असून १८१३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ही टक्केवारी १३.६ इतकी आहे. अन्य एका शासकीय प्रयोगशाळेमध्ये ४४ हजार ५५६ स्वॅब तपासण्यात आले. त्यापैकी १३.२ टक्के म्हणजे ५ हजार ९०२ इतके स्वॅब पाॅझिटिव्ह आले आहेत. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात २१ हजार ९८५ स्वॅबची तपासणी करण्यात आली. याठिकाणी ९.९ टक्के म्हणजे २१६९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
याउलट जिल्ह्यातील सात खासगी प्रयोगशाळांमधील अहवाल मात्र जादा संख्येने पॉझिटिव्ह आले आहेत. खासगी प्रयोगशाळांमधील अहवाल मात्र कमीत कमी २५ टक्के ते ४१ टक्क्यांपर्यंत पॉझिटिव्ह आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यातील काही प्रयोगशाळा मुंबई आणि पुणे येथे कार्यरत आहेत. कोल्हापुरात स्वॅब संकलन करून ते पुणे, मुंबई येथून तपासणी करून आणले जातात. येथील एका मोठ्या खासगी आरोग्य संस्थेतील प्रयोगशाळेतील ३८ टक्क्यांहून जादा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर अन्य एका प्रयोगशाळेतील ४१ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चौकट
शासकीय प्रयोगशाळा पाॅझिटिव्ह टक्केवारी खासगी प्रयोगशाळा पॉझिटिव्ह टक्केवारी
१३.६ टक्के ३८.८ टक्के
९.९ टक्के ४१.७ टक्के
१३.२ टक्के २९.२ टक्के
९.९ टक्के २५.५ टक्के
चौकट
उच्च आणि उच्चमध्यमवर्गीयांचा अधिक कल
शासकीयपेक्षा खासगी प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी करून घेण्याकडे उच्च आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांचा कल जास्त असल्याचे दिसून येते. शासकीय रुग्णालयातील गर्दीत जाऊन स्वॅब देण्यापेक्षा खासगी प्रयोगशाळेचे प्रतिनिधी घरात येऊन स्वॅब नेत असल्याने अनेकांनी या लॅबना प्राधान्य दिले.