मुरगूड : मुरगूड परिसरातील बोळावी, चिमगाव, करंजिवणे, शिंदेवाडी, कुरणी, यमगे, सुरूपली आदी गावांतून गेल्या पंधरा दिवसांत मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात ११८ ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार करून त्यातील १०९ रुग्णांना घरी पाठविले आहे. अद्याप नऊजणांवर उपचार सुरू असून, आज दिवसभरामध्ये शहरातील विविध रुग्णालयात २५ हून अधिक ग्रॅस्ट्रोचे रुग्ण दाखल झाले आहेत. पण कागल तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कोणतीच साथ पसरली नसल्याचा निर्वाळा कागलमध्ये बसून निवेदनाद्वारे दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरातील हळदवडे, सुरूपली, यमगे, शिंदेवाडी या गावांत गॅस्ट्रोसदृश साथीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले होते. हळदवडे गावात तर दोन दिवस चिखली आरोग्य विभागाचे पथक ठाण मांडूनच बसले होते. पैकी काही रुग्णांचा गॅस्ट्रोचा रिपोर्टही सकारात्मक मिळाला होता. युद्धपातळीवर या गावांत उपाययोजना झाल्यानंतर रुग्णांच्या पंक्तीत सुधारणा झाली होती. या गावांमध्ये सभापती पिंटू यांनी भेट दिली होती, पण सध्या आठ दिवसांपासून बोळावी, चिमगाव, करंजिवणे, कुरणी गावात या लक्षणाचे रुग्ण आढळत आहेत. रुग्णांना मोठ्या प्रमाणात जुलाब उलट्या सुरू झाल्या आहेत. त्यामधील बरेचसे रुग्ण मुरगूडच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचीच नोंद मिळते.शहरातील खासगी रुग्णालयामध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. अशा पद्धतीची गंभीर परिस्थिती असताना आणि आज सर्वच वर्तमानपत्रात याबाबत वृत्त प्रसिद्ध हाऊनसुद्धा कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याने नागरिकांत अंसतोष आहे. रुग्णांवर चांगल्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालयात उपचार होत आहेत, पण ज्या गावांतून रुग्ण येत आहेत, त्या गावांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती पाहण्याची गरज आहे.आरोग्याधिकाऱ्यांनी हाकल्या उंटावरून शेळ्या आज मुरगूड परिसरामधील कोणत्याच गावामध्ये गॅस्ट्रोसदृश आजाराची साथ नसल्याचा निर्वाळा कागल तालुका आरोग्याधिकारी डॉ. अजितकुमार गवळी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर जावक क्रमांक शासकीय कोणताही शिक्का नसून हे एका साध्या कागदावर तयार केले आहे. शहराच्या परिसरातील रुग्ण इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णालयात भरती होत असताना कागलमध्ये बसून आपल्या कर्मचाऱ्यांकरवी निवेदन देणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.
मुरगूड परिसरात आणखी गॅस्ट्रोचे रुग्ण
By admin | Published: November 18, 2014 12:57 AM