कोल्हापूर : कोरोनाचा भविष्यातील संसर्ग रोखण्यासाठी शहरात मंगळवारी रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. दरम्यान, रात्री साडेदहाच्या सुमारास संपूर्ण शहरातून पोलिसांनी संचलन करून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे मध्यरात्रीनंतर रस्ते पुन्हा सुनसान बनले.सलग १५ दिवस रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे. मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी कडक करण्यासाठी पोलीस अधिकारी व शंभरहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उतरले होते. बंदोबस्ताबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिवसभर बैठका घेऊन शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार रात्री साडेदहाच्या सुमारास प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस वाहनांसह संपूर्ण शहरातून संचलन केले.
शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे संचलन झाले. या संचलनामध्ये रात्री ११ नंतर सर्वच व्यवहार बंद ठेवावेत, नागरिकांनी रस्त्यांवर फिरू नये, अशा सूचना देण्यात आल्या. या संचारबंदीमध्ये अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आले आहे.