कोल्हापूर : मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे; पण तो आता फारसा दिसेनासा झाला आहे. छायाचित्रकार विजय टिपुगडे यांच्या कॅमेऱ्यातून बंदिस्त झालेल्या मोरांच्या विविध भावमुद्रा प्रत्येकाला प्रसन्न आणि टवटवीत करणाऱ्या आहेत. कलाप्रेमी त्यांच्या या छायाचित्रांना घरांत नक्कीच स्थान देतील, अशी अपेक्षा जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी व्यक्त केली.रेखासम्राट टी. के. वडणगेकर आणि पत्रकार व्यंकटेश चपळगावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘गुरुशिष्य’ परिवारातर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनातील कलादालनात रविवारी, ‘दुनिया मोरांची’ या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ चित्रकार के. आर. कुंभार होते. यावेळी ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे, विजयमाला मेस्त्री, डॉ. अनुराधा गुरव, नगरसेवक सत्यजित कदम, सीमा कदम, झुंजार सरनोबत, संजीव देवरुखकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रदीप पांजरे, जयेश ओसवाल, प्रकाश राठोड, प्राचार्य अजेय दळवी, आदी उपस्थित होते. पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड म्हणाले, मोरांच्या मुद्रा विलोभनीय असल्या तरी त्या सहजपणे पाहायला मिळणे कठीण असते. त्यासाठी नियमित पाठपुरावा करण्याची चिकाटी, एकाग्रता, कलेची नजर आणि मुख्य म्हणजे त्यांच्या नैसर्गिक अधिवासास धक्का न बसू देण्याची मोठी जबाबदारी पेलावी लागते. हे काम टिपुगडे यांनी नेटाने केले असून, त्याची प्रचिती या प्रदर्शनाच्या निमित्ताने येते.रांगोळीच्या माध्यमातून अनेक कलाकारांना घडविले; पण आता रांगोळीचे काम थांबविणार असून, पूर्णवेळ चित्रकार आणि छायाचित्रकार म्हणूनच कार्यरत राहणार असल्याचे टिपुगडे यांनी सांगितले. दगडखाण कामगारांचे नेते अॅड. बी. एम. रेगे यांनी सामाजिक जाणिवेतून टिपुगडे यांच्या सुरू असलेल्या कार्याचा गौरव केला.निसर्गवैभवाने समृद्ध अशा कोल्हापूरच्या विविध भागांत आढळणाऱ्या या पक्ष्याच्या जगण्यातील विविध क्षण, मोरांच्या इतरही काही विलोभनीय मनमोहक अदा छायाचित्रकार टिपुगडे यांनी कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी मोराची दीड हजारांहून अधिक छायाचित्रे काढली आहेत. यांतील निवडक छायाचित्रांची मांडणी प्रदर्शनस्थळी करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते टिपुगडे यांच्या ‘निवडक कलासाधना’ आणि ‘दुनिया मोरांची’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. आझाद नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. सागर बगाडे यांनी प्रास्ताविक केले. युवराज कदम यांनी आभार मानले. सकाळपासूनच अनेक कलाप्रेमींनी हे प्रदर्शन पाहायला गर्दी केली होती. हे प्रदर्शन शनिवार (दि. १९) पर्यंत सकाळी ९.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
मोराचे फोटो घराघरांत पोहोचतील...!
By admin | Published: March 13, 2016 11:37 PM