कोल्हापूर : पंचगंगेच्या पुराची पातळी सध्या ५४ फुटांपर्यंतपर्यंत गेली असून ती आज शनिवारी ५५ फुटांपेक्षाही वर जाणार आहे. हवामान खात्याने आजदेखील रेड अलर्ट दिला असून, दुसरीकडे राधानगरी धरणाचे सगळे दरवाजे उघडले जातील. ही स्थिती २०१९ च्या महापुरापेक्षाही गंभीर होणार असून पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. नदीकाठच्या व शहरांतील पूरबाधित होणाऱ्या नागरिकांनी तातडीने स्थलांतरित व्हावे, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी केले.
मंत्री पाटील म्हणाले, २०१९ साली पंचगंगेची पातळी ५५.६ फूट इतकी होती, आज ती ५३.६ फुटांवर असून उद्या, शनिवारपर्यंत ५५ फुटांवर जाणार आहे. हवामान खात्याने आजदेखील रेड अलर्ट दिला आहे, शिवाय राधानगरी धरण भरत आले असून आज शनिवारी सकाळी सगळे दरवाजे उघडले जातील. ते पाणी वाढल्यावर दोन वर्षांपूर्वीपेक्षाही गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे ज्या भागात याआधी पुराचे पाणी आले नव्हते तेथेदेखील पाणी येण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी आमच्याकडे पाणी येत नाही, असे गृहीत न धरता स्थलांतर करावे.
--
एनडीआरएफची तिसरी टीम दाखल
कोल्हापूरच्या मदतीसाठी एनडीआरएफची तिसरी टीम शुक्रवारी दाखल झाली ही टीम येताच प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवाजी पूल येथून रवाना झाली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदार पी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच एनडीआरएफचे जवान उपस्थित होते. पूरग्रस्त प्रयाग चिखली, आंबेवाडी भागातील उर्वरित नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
---
हॉस्पिटलमध्ये पाणी
महावीर कॉलेजजवळील डायमंड हॉस्पिटल तसेच खानविलकर पेट्रोल पंप परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला. हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना हॉस्पिटलमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी पालकमंत्री स्वतः पुढे सरसावले आहेत.
---
आणखी ४ टीमसाठी प्रयत्न
मंत्री पाटील म्हणाले, पूरस्थिती आणखी गंभीर झाल्यास नागरिकांच्या स्थलांतर व मदतीसाठी एनडीआरएफच्या आणखी ४ टीमची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. सध्या जिल्ह्यात एनडीआरएफच्या ३ टीम बचावकार्य करत आहेत. एका टीममध्ये ३ बोटी, ३ अधिकारी, २५ जवान आहेत.
---
फोटो कालेडेस्कला एनडीआरएफ नावाने पाठवला आहे.
२३ सतेज पाटील
ओळ : पूरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी शुक्रवारी एनडीआरएफची तिसरी टीम कोल्हापुरात दाखल झाली. ही टीम शिवाजी पूल येथून पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी.एन. पाटील यांच्या उपस्थितीत आंबेवाडी, चिखलीसाठी रवाना झाली.
---