कोल्हापूर : शहराच्या विविध भागांत अचानक आलेल्या पूर परिस्थितीमुळे पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनधारकांना आपले वाहन सुरक्षित ठिकाणी नेता आले नाही. परिणामी, अशा वाहनधारकांना दुरुस्तीसाठी किमान १५०० ते १० हजारांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. यात केवळ विमा असलेल्या वाहनधारकांचा अपवाद वगळता इतरांनाही फटका बसणार आहे. यात सुमारे सात हजारांहून अधिक वाहनांचा समावेश आहे.शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, नागाळा पार्क, जाधववाडी, रमणमळा, न्यू पॅलेसमागील परिसर, जाधववाडी, बापट कॅम्प, आदी परिसरात नागरिकांनी पार्किंग करून ठेवलेल्या दुचाकी वेळेअभावी सुरक्षित ठिकाणी नेण्यास अडचण झाली. त्यामुळे ती पुराच्या पाण्यात तशीच राहून गेली. परिणामी त्यांच्या दुरुस्तीशिवाय पर्याय राहिला नाही. बाधित झालेल्या दुचाकीकरिता किमान १५०० रुपये, तर जास्तीत जास्त १० हजारांहून अधिक खर्च येणार आहे. अशा वाहनधारकांना दिलासा देणारी बाब म्हणजे कोल्हापूर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचे ५०० हून अधिक मेकॅनिक सदस्य जाग्यावर जाऊन दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरीही वाहनधारकांच्या परिस्थितीनुसार आकारली जात आहे.हे पार्ट बाधितपेट्रोल टाकी, स्विच, प्लग, कार्बोरेटर, सायलेन्सर, वायरिंग यांच्यावर परिणाम झाला तर केवळ १५०० रुपयांत दुरुस्त होण्याची शक्यता आहे, तर इंजिनच्या क्रँक बेअरिंग्जमध्ये पाणी गेले तर संपूर्ण इंजिन उतरावे लागणार आहे; यासाठी लागणारा खर्च किमान पाच हजारांच्या वर आहे. स्कूटर, मोपेडमध्ये अॅक्टिव्हा, अॅक्सिसमध्ये पाणी गेल्यास हाच खर्च १० हजारांच्या वर येत आहे; कारण या दुचाकींसाठी लागणाऱ्या स्पेअर पार्टच्या किमती सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणाºया आहेत.२५०० हून अधिक चारचाकी दुरुस्तीसाठी दाखलशहरासह औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चारचाकी वितरकांकडे पूरबाधित चारचाकींची संख्या अधिक आहे. विशिष्ट एका भागात एकाच कंपनीच्या सुमारे १२०० हून अधिक चारचाकी पाण्यात अडकल्या होत्या. अशा कंपन्यांनी ग्राहकाने फोन केल्यानंतर वाहने मोफत क्रेनद्वारे उचलून नेल्या, अशा ग्राहकांना विमा संरक्षणाचा लाभ झाला. यात सुमारे सर्वच कंपन्यांच्या एकूण २५०० हून अधिक चारचाकी केवळ पाण्यात राहिल्याच्या कारणाने दुरुस्तीसाठी दाखल झाल्या आहेत.
शहरातील सात हजारांहून अधिक दुचाकी पूरबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:27 AM