कोल्हापूर : राष्टÑवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते व कार्यकर्त्यांसमवेत खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास भेट देऊन पाठिंबा दिला; पण तासाभरातच पवार कोल्हापुरात आहेत तोपर्यंतच महाडिक यांनी ‘ताराराणी आघाडी’च्या नगरसेवकांसमवेत दुसऱ्यांदा ठिय्या आंदोलनास भेट दिली. महाडिक यांच्या या भूमिकेचे राष्टÑवादीमध्ये तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्त्यांत यामुळे अस्वस्थता पसरली असून, विशेषत: राष्टÑवादीच्या नगरसेवकांतून संताप व्यक्त होत आहे.खा. महाडिक हे निवडून आल्यापासून पक्षात सक्रिय नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी आजपर्यंत अनेक वेळा पक्षश्रेष्ठींकडे केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार हे शनिवारी कोल्हापूर दौºयावर होते. याही वेळी सकाळपासून खा. महाडिक हे पवार यांच्यासोबत होते. विशेष म्हणजे पवार यांनी दसरा चौक येथे सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास भेट दिली. यावेळी पक्षातील प्रमुख नेते, कार्यकर्त्यांसह खासदार महाडिक हेही तिथे उपस्थित होते. ते पवार यांच्यासमवेत केशवराव भोसले नाट्यगृहात ‘राजर्षी’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यासही हजर राहिले. तेथून खासदार महाडिक महापालिकेतील ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांसमवेत दसरा चौकात आले आणि त्यांनी मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला. हे वृत्त सोशल मीडियावरून पसरताच राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांत तीव्र पडसाद उमटले. पक्षाचा नेता अजून कोल्हापुरात असताना खासदार ‘ताराराणी’च्या नगरसेवकांना घेऊन बसतात कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरून व्हायरल झालेले फोटो पक्षाध्यक्ष पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे समजते.
सकाळी पवार यांच्यासोबत, दुपारी ‘ताराराणी’कडे- खासदारांची ठिय्या आंदोलनास दोनवेळा भेट : राष्टवादीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 1:28 AM