कोल्हापूर : शहरातील कोरोनाने मृत्यू होणाऱ्याची संख्याही खाली येत आहे. महिनाभरात ४.१ टक्क्यांवरून ०.७ टक्क्यावर मृत्युदर खाली आला आहे. यावरून शहरातही कोरोनाची लाट ओसरत असल्याचे समोर येत आहे. एकूण तपासणीच्या तुलनेत बाधित होण्याच्या प्रमाणातही घट झाली आहे.
दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक प्रभाग हॉटस्पॉट बनले होते; पण आठवड्यापासून कोरानाबाधित आणि त्याने मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी शहरात ४५० ते ५०० बाधित होते. ते प्रमाण मंगळवारी २७३ वर आले आहे.
दरम्यान, शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेतर्फे संजीवनी अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. लसीकरण वाढविण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. शहरात ३ ते ९ मे दरम्यान मृत्युदर ४.१ टक्के होता. तो २४ ते ३० मे दरम्यान १.२ टक्के झाला. ७ ते १३ जून दरम्यान ०.९ टक्के व १४ ते २० जून दरम्यान ०.७ टक्के इतका कमी झाला आहे.
कोट
महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनामुळे मृत्युदरही कमी होत आहे. शहरातील नागरिकांनी सर्वेक्षणावेळी यंत्रणेला सहकार्य करावे. लक्षणे आढळल्यास त्वरित कोरोनाची तपासणी करून घ्यावी. बाधित असल्यास लवकर निदान होईल. उपचारही वेळेत मिळतील.
- डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक