कोल्हापूर : मंगलमूर्ती मोरया, एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार अशा जयघोषात आज, मंगळवारी घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. ढोल, ताशाच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत लहान-थोर, मुली, महिलांनी चैतन्यमयी वातावरणात बाप्पाचे स्वागत केले.सकाळपासूनच घरगुती गणपती आणण्यासाठी कोल्हापुरातील कुंभार गल्ली, पापाची तिकटीचा परिसर गर्दीने भरून गेला आहे. गणपतीच्या आगमनासाठी शहरवासिय उत्साहाने सज्ज झाले आहेत. आरास, नैवेद्य, पूजा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली जात आहे. प्रमूख मार्ग, चौक गर्दीने ओसंडून वाहू लागले आहेत. गणेशाच्या स्वागतादरम्यान पारंपारिक वाद्याच्या दणदणाटाने सारा परिसर दुमदूमून गेला. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असली तरी गणेशोत्सवाच्या जल्लोषाने सारे शहर व्यापून गेले आहे.दुचाकी, चारचाकी, रिक्षा, हातगाडे, रथ यातून वाजत गाजत गणेश आगमन होत होते. चप्पल लाईन, दत्त गल्ली, पापाची तिकटी येथे वाहतूक कोंडी झाली होती. शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत वाहतूक संथ गतीने सुरू होती. रंकाळा टॉवर, गंगावेश, फुलेवाडी रिंगरोड येथेही वाहतूक संथ गतीने होती. संध्याकाळी मंडळाच्या गणरायाचे आगमन होणार असल्याने डॉल्बी, वाद्य, लेसर शोचा झगमगाट दिसून येणार आहे. पोलिस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे.
कळंब्यासह उपनगरात गणरायाचे उत्साहात आगमनअमर पाटीलकळंब्यासह लगतच्या राजलक्ष्मीनगर, साळोखेनगर,तपोवन, सुर्वेनगर, आपटेनगर, संभाजीनगर कळंबाजेल, रंकाळातलाव, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, रिंगरोड, रायगड कॉलनी प्रभागात विघ्नहर्ता गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात ढोलताशा, झानजपथक, बेंजो,टाळमृदुंगाच्या गजरात वाजतगाजत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका सुरु होत्या.बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड बाजारपेठेत मिठाईच्या दुकानात नैवेद्य खरेदीसाठी फळे, फुले, फटाके, रांगोळी, विद्युत रोषणाई साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती. बाजारपेठेत यंदा उत्साह संचारल्याचे चित्र होते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांमध्ये नाराजीखड्ड्यातुन आगमन उपनगरातील मुख्य रस्त्यांसह विविध कॉलनी अंतर्गत रस्त्यांची डागडुजी प्रशासनाने किमान गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी करणे आवश्यक होते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने न पाहिल्याने गणेशाचे आगमन खड्ड्यातुन झाल्याने भक्तवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली.