विश्वास पाटीललोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्रात कमावत्या वयोगटातील (३१ ते ४०) लोक कोरोनाला सर्वाधिक बळी पडत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक २१.९६ टक्के रुग्ण हे या वयोगटातील आहेत. या लोकांमध्ये ‘आपल्याला काही होत नाही’ अशी बेफिकिरी जास्त आहे. त्यांचा सार्वजनिक वावरही नोकरी, व्यवसायानिमित्ताने जास्त असल्याने त्यांना संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांमधील संसर्ग व मृत्यूचेही प्रमाण जास्त होते. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यावर आरोग्य विभागाने सर्वाधिक भर दिला. त्यामुळेच केंद्र सरकारने लसीकरणात त्यांनाच प्राधान्य दिले. त्यामुळे हा घटक कोरोनापासून संरक्षित झाल्याचे अनुभवण्यास येत आहे. याउलट आता २१ ते ४० या वयोगटातील कोरोना संसर्गाचे प्रमाण तब्बल ४८.७५ टक्के म्हणजे एकूण रुग्णांच्या जवळजवळ निम्मे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येमध्येही या वयोगटाची लोकसंख्या जास्त आहे. मास्क वापरण्यासह पुरेशी दक्षता घेण्यात हयगय, तसेच लसीकरण न झाल्यानेही या वयोगटातील संसर्ग वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने समाजात सर्वाधिक वावर असलेला हा वयोगट आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. नाक व तोंडावर नीटपणे मास्क न वापरणे व या वयोगटातील लोकांचे न झालेले लसीकरण हीदेखील त्याची कारणे आहेत. -डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर