कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मोहरमनिमित्त शहरातील प्रमुख पंजांची रविवारी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करण्यात आली. यात घुडणपीर, झिमझिम साहेब, चाँदसाब वली, मलिक रेहान, बाराईमाम, गरीबशहा, आदी पंजांचा समावेश आहे.
यंदा गणेशोत्सव व मोहरम असे दोन्ही सण एकाच काळात आले आहेत. काही तालीम संस्था व कुटुंबांमध्ये गणेशमूर्ती व पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे; तर पाचव्या दिवशी शिवाजी चौकातील घुडणपीर, तेली गल्लीतील आप्पा शेवाळे यांचा बालासाहेब मौला हुसेन, ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळाचा छोटे बाबाचाँद साहेब, शाहू मिल परिसरातील झिमझिम साहेब, बुधवार पेठेतील लगोडबंद साहेब, सोमवार पेठेतील चॉँदसाब वली, उमा टॉकीज परिसरातील मलिक रेहान, महात गल्ली येथील मेहबूब सुबहानी, रिकिबदार गल्ली येथील चाँदसाब वली, गुजरी कॉर्नर येथील दस्तगीर साहेब, नालबंदवाडा येथील झुमझुमसाब, घुडणपीर मोहल्ला येथील अली झुल्फिकार, राजेबागस्वार दर्गा, मौला अली, आदी ठिकाणी रविवारी रात्री उशिरा पंजे प्रतिष्ठापना करण्यात आली. अन्य काही ठिकाणी पंजांची दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शुक्रवार पेठ, खोल खंडोबा तालीम येथील चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या चाँँदसाब वलीसो पीरपंजाचीही प्रतिष्ठापना झाली आहे. यासाठी विजय जाधव, किरण सूर्यवंशी, लोकेश सूर्यवंशी, स्वप्निल सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, आदी परिश्रम घेत आहेत. यानिमित्त भव्य मंडप उभा करण्यात आला असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.