कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर प्रभागात गेल्या दहा दिवसात सर्वाधिक २३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ राजारामपुरी, फुलेवाडी, रामानंद, साने गुरुजी वसाहत, सुर्वेनगर, कसबा बावडा या प्रभागांचा समावेश आहे. संपूर्ण शहरात गेल्या दहा दिवसात ४०४९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्येक दहा दिवसांनी शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय कोरोना रुग्णांचा आढावा घेतला जात आहे.त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे सोपे जाणार आहे. परंतु एकीकडे महापालिका प्रशासन उपाययोजना करीत असताना दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग काही कमी व्हायला तयार नाही. शहरात गेल्या काही दिवसांपासून रोज ३०० ते ४०० नवीन रुग्ण आढळून येत आहेत.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पुढाकार घेतल्यामुळे शहरात तीन स्तरावर कोरोना बाधित रुग्ण शोधण्याच्या मोहिमा राबिवल्या जात आहेत. घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण, संजीवनी अभियानअंतर्गत व्याधीग्रस्तांचे सर्वेक्षण तसेच माझा विद्यार्थी माझी जबाबदारी अंतर्गत व्याधिग्रस्त विद्यार्थ्यांच्या संपूर्ण कुटुंबांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यामुळे शहरात अँटिजेन तसेच आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. सध्या तीन प्रकारची अभियाने राबविली जात असल्यामुळे कोरोनाचा संसर्गावर नियंत्रण राखण्यात यश आले आहे.
शहरातील शिवाजीपेठेत असलेल्या चंद्रेश्वर प्रभागात गेल्या दहा दिवसात २३६ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. दाट नागरी वस्ती असलेल्या या प्रभागात नागरिक काळजी घेत नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. राजारामपुरी प्रभागात १६५, फुलेवाडी प्रभागात १२५ , रामानंदनगर प्रभागात १२१, साने गुरुजी वसाहत प्रभागात १२०, सुर्वेनगर प्रभागात ११६, कसबा बावडा लाईन बाजार प्रभागात १०४, फुलेवाडी रिंगरोड प्रभगात ९७, शिपुगडे तालीम प्रभागात ९२ तर राजेंद्रनगर प्रभागात ९० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या या दहा प्रभागात १२६६ रुग्ण आढळून आले असून ते उपचार घेत आहेत.