कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’अंतर्गत साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाची वेगाने तयारी सुरू आहे. ज्या तालुक्यांना याआधी साहित्य पाठविण्यात आले होते, त्या ठिकाणी साहित्याची जुळणीही सुरू असून, नव्या साहित्याचे ट्रकही दाखल होत आहेत.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले आणि रतनलाल कटारिया यांच्या हस्ते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजामाता पदवीदान सभागृहामध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची तारीख निश्चित झाल्यानंतर लगेचच अॅल्मिको कंपनीचे सात तंत्रज्ञ कोल्हापुरात दाखल झाले असून, त्यांनी गेल्या आठ दिवसांपासून विविध पंचायत समित्यांमध्ये ठेवलेल्या साहित्याची जुळणी करण्यास सुरुवात केली आहे. शिरोळ, हातकणंगले, चंदगड, आजरा येथील साहित्य जुळविण्यात आले आहे; तर कागल येथे हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी रुपयांचे साहित्य आले होते आणि सहा कोटी रुपयांचे साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे.कोल्हापूरशेजारील करवीर, कागल, हातकणंगले येथून अधिकाधिक दिव्यांगांना या कार्यक्रमासाठी आणण्यात येणार असून, उर्वरित तालुक्यांमधूनही दिव्यांग येणार आहेत. त्यांच्यासाठी एस. टी. बसेसची सोय करण्यात आली आहे. प्रत्यक्ष व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते २५ दिव्यांगांना साहित्य वितरित केले जाणार आहे. याच परिसरात १२ स्टॉलवरून दिव्यांगांना साहित्य दिले जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात कार्यक्रमया मुख्य कार्यक्रमामध्ये सर्वांनाच साहित्य देता येणार नसल्याने २६ फेब्रुवारी ते पुढे १० दिवस प्रत्येक तालुक्यात हे साहित्य वितरित करण्याचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. त्यासाठीही नंतर लगेचच पंचायत समित्यांकडून नियोजन करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमाआधी दिव्यांग मुलामुलींचा सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.विविध समित्यांची स्थापनाहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेने १२ समित्यांची स्थापना केली आहे. कार्यक्रम संनियंत्रण समितीपासून भोजन, वाहतूक, बैठक, आरोग्य अशा या समित्या असून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागप्रमुखाकडे यातील जबाबदारी देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्याकडे प्रमुख संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.