कोल्हापूर : वर्षभरापूर्वी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वे स्थानक) येथे सुरू केलेली विश्रांतिगृहाची सुविधा चांगली आहे. पण, बहुतांश प्रवाशांना या ठिकाणी संबंधित सुविधा उपलब्ध असल्याची माहितीच नसल्याचे चित्र आहे. या सुविधेसाठी मध्य रेल्वेने निर्धारित केलेल्या वेळेमुळे प्रवाशांना आर्थिक फटकादेखील बसत आहे.मुंबई, पुणे येथील स्थानकावरील सुविधेच्या धर्तीवर कोल्हापूर स्थानकावर फेब्रुवारी २०१९ मध्ये विश्रांतिगृहाची सुविधा सुरू केली. २४ जणांसाठीची विश्रांती घेण्याची व्यवस्था तेथे आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने या विश्रांतिगृहात लहान-लहान कक्ष तयार केले आहेत. त्यामध्ये संंबंधित प्रवाशांना त्यांच्या प्रवासी बॅगा ठेवता येतात. विश्रांतीसाठी पलंग आहेत.स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा बारा तास लाभ घेण्यासाठी ९० रुपये आणि चोवीस तासांसाठी १५० रुपये शुल्क आकारले जाते. आतापर्यंत साधारणत: सुमारे साडेतीन हजार प्रवाशांनी त्याचा लाभ घेतला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणारी आहे. मात्र, त्याची रेल्वेस्थानकावर योग्य स्वरूपात प्रवाशांना माहिती मिळत नसल्याचे वास्तव आहे.
ही सुविधा उपलब्ध असल्याची, वेळ आणि शुल्काबाबतची माहिती देणारे फलक संबंधित विश्रांतिगृह आणि मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांच्या कार्यालयात आहेत. ते प्रवाशांच्या पटकन लक्षात येत नाहीत. सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ अशी या सुविधेची वेळ आहे.
हरिप्रिया एक्स्प्रेस दुपारी चारनंतर येते. त्यातील प्रवाशांना या सुविधेचा लाभ घ्यावयाचा असेल, तर त्यांना चोवीस तासांचे शुल्क भरावे लागते. त्यामुळे दुपारी आणि रात्री येणारे रेल्वे प्रवासी या सुविधेचा लाभ घेण्याचे टाळत आहेत. तासानुसार शुल्क आकारणी करावी, अशी त्यांच्यातून मागणी होत आहे. या विश्रांतिगृहात गरम पाणी देण्यासाठी रेल्वे विभागाने तेथे सोलर यंत्रणा बसविली आहे; पण ती अद्याप सुरू झालेली नाही. गरम पाणी मिळत नसल्याने अनेक प्रवासी येथे येणे टाळत आहेत.
स्पष्ट माहिती मिळावीस्थानकाच्या प्रवेशद्वारात, तिकीट विक्री, आरक्षण कक्षात आणि प्लॅटफॉर्मवर दोन-तीन ठिकाणी या विश्रांतिगृहाची माहिती देणारे मोठे फलक लावण्यात यावेत. त्यातून या सुविधेची स्पष्टपणे माहिती देण्यात यावी.
या विश्रांतिगृहाची सुविधा प्रवाशांसाठी उपयोगी ठरणारी आहे. या सुविधेची माहिती रेल्वे विभागाने प्रवाशांना देणे आवश्यक आहे. त्यातून प्रवाशांची कमी खर्चात विश्रांतीची सोय होईल आणि रेल्वेचे उत्पन्नदेखील वाढेल.-शिवनाथ बियाणी, सदस्य, पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समिती
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना आॅनलाईन माहिती आणि नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. स्थानकावर फलक लावले आहेत. आवश्यकता वाटल्यास या सुविधेची माहिती देणारे आणखी फलक लावले जातील.-ए. आय. फर्नांडीस, स्थानक प्रबंधक.