विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरआई कधी सोडून गेली हे त्यालाही माहीत नाही परंतु आईची ओढ त्याच्या मनांत खोलवर घट्ट...त्या ओढीने तो घरातून उठतो आणि चालायला लागतो. परवाही तसेच झाले. घर सोडले आणि तो लक्ष्मीपुरीत कांदा-बटाटा मार्केटपर्यंत गेला. तिथेच नऊ दिवस मिळेल ते खाऊन दुकानाच्या पायरीवर झोपला.त्या परिसरातील नागरिकांना त्याची दया आली म्हणून त्यांनी ‘चाईल्ड लाईन’ संस्थेस कळविले. त्यांच्या पुढाकाराने अखेर तो बालकल्याण संकुलात दाखल झाला. तेथील मुलांमध्ये आता तो चांगला रमला आहे. शेखर चंद्रकांत मोहिते (वय १२, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट, कोल्हापूर) असे त्याचे नाव. बालकल्याण संकुलमध्ये सायंकाळी आजी, चुलतभाऊ व चुलतीशी तब्बल पंधरा दिवसांनी गळाभेट झाल्यावर सगळ््यांनाच गलबलून आले. घर सोडून ही संस्थाच त्याचे आता नवे घर बनले आहे.पाच जूनला बागेत खेळायला जातो म्हणून गेलेला तो घरी फिरकलाच नाही. शेखर शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेत पाचवीत शिकतो. अभ्यासात एकदम हुशार. सगळ््यांना माया लावणारा. राजाराम चौकात तो चुलती सुवर्णा अनिल मोहिते यांच्या जवळ राहतो. त्या धुण्याभांड्याची कामे करतात. त्यांचे पती वाजंत्री. मुलगा हरवल्याची तक्रार त्यांनी जुना राजवाडा पोलिसांत सात तारखेला दिली. त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये १८ जूनला प्रसिद्ध झाले; परंतु शेखर हा बेपत्ता झाला नव्हता, तर स्वत:च निघून गेल्याचे आता स्पष्ट झाले. यापूर्वीही तो असाच दोन-तीनवेळा निघून गेला होता. वडिलांनीच सुटीत कामावर लावतो म्हणून लक्ष्मीपुरीत सोडले होते, असे तो सांगतो परंतू कुटुंबीयांच्या मते वडील त्यादिवशी घरी नव्हते. तोच स्वत:हून निघून गेला. लक्ष्मीपुरीत नऊ दिवस मिळेल ते खाऊन राहिला. दुकानदार त्याला काही तरी खायला देत. त्या परिसरातील लोकांनी त्यास कपडे व पांघरूण दिले. रात्री दुकानाच्या दारात तो झोपत असे. त्या परिसरातील कुणीतरी जागरुक नागरिकांनी अग्निशामक दलास या मुलाबद्दल माहिती दिली. त्यांनी अशा मुलांच्या पुनर्वसनाचे काम करणाऱ्या ‘चाईल्ड लाईन’ संस्थेला ही माहिती दिली. त्यांनी लक्ष्मीपुरीत जाऊन शेखरला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने विसंगत माहिती दिली. आपण राजारामपुरीत राहत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या मनांत आईबद्दल ओढ असल्याचे त्यांना जाणवले. घरी जाण्यास त्याचा नकार परंतु आईकडे जाणार का, म्हटल्यावर तो लगेच तयार होतो. चाईल्ड लाईन संस्थेच्या जिल्हा समन्वयक अनुजा खुरंदळ, अस्मिता पवार, जुबेर शिकलगार यांनी त्यास बालकल्याण संकुलमध्ये १४ जूनला दाखल केले. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून संस्थेने त्याची चुलती सुवर्णा मोहिते यांच्याशी बुधवारी संपर्क साधला व शेखर बालकल्याणमध्ये असल्याचे त्यांना कळविले. आज गुरुवारी दुपारी बालकल्याण समितीची बैठक अध्यक्षा प्रिया चोरगे, सदस्य दीपक भोसले, संजय देशपांडे यांच्या उपस्थितीत झाली. त्या बैठकीत चौकशी व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. चाईल्ड लाईन संस्थेने गृहभेटीचा अहवाल सादर केला. मोहिते कुटुंबियांची परिस्थिती जेमतेम असल्याने शेखरच्या भवितव्याचा विचार करून त्याला संस्थेच्या बालगृहातच ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला.