कोल्हापूर - पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यामधील गंभीर पूरस्थितीशी दोन हात करत पन्हाळा तालुक्यातील वाघवें येथील गरोदर मातेने एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला.
महापुराने जिल्ह्यात गंभीर स्वरूप धारण केल्यामुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधांअभावी वंचित राहावे लागत आहे. अशीच एक गरोदर माता वाघवे ता.पन्हाळा येथे प्रसूती वेदनेने तळमळत होती. महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, कोल्हापूरचे डॉ. अभिजित पाटील यांना ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री याबाबत समजल्यावर त्यानी त्या मातेला लगेच कोल्हापूरकडे हलविण्याचे ठरवले. थोड्याच अंतरावर पोर्ले-उतरे मार्गावर ओढ्यावर गुढघाभर पाणी आलं होतं. रेस्क्यू टीमला बोलवले तरी किमान चार तास लागले असते. त्यामुळे अशोक पायलट याना सोबत घेऊन ते पाण्यात थोडं पुढे चालत गेले.
रस्ता वाहून गेला नसल्याची खात्री करुन त्यानी गाडी गुडघाभर वाहत्या पाण्यात घातली. वाघवेत पोहोचून मातेला गाडीत घेतलं. सीपीआरला जात असताना पुन्हा पाणी थोडं वाढलं होतं. पण मातेची परिस्थिती कठीण होती, त्यामुळे पुन्हा गाडी पाण्यातून पुढे नेण्यात आली. पुढे उचगावच्या उड्डाणपूलाच्यापुढे पुन्हा पाणी आलं होतं. इथेही माहिती घेतली आणि याही पाण्यामधून वाट काढून त्यानी मातेला सीपीआरमध्ये सुखरुप पोहोचवलं आणि मातेने गोंडस राजकुमाराला जन्म दिला. बाळ आणि त्याची आई सुखरुप आहेत.
बाळाच्या आजोबांनी फोन केला आणि पुराच्या पाण्यामधून माझ्या लेकीला वाचवलं. देवासारखं धावून आलात". असं बोलून डॉ. पाटील यांना त्यांनी आशिर्वाद दिला.
या घटनेनंतर डॉ. पाटील यांनी लोकमतशी बोलताना पूरग्रस्त भागामधील गरोदर मातांच्या नातेवाईकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या मातांचं , लवकरात लवकर सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं, जेणेकरुन त्यांना इमर्जन्सीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. तसेच पूरग्रस्त भागामधे शासनाने बोटींची व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे.