लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका महिलेने नवजात मुलीला सांगली येथील एका रुग्णालयात जन्म देऊन तेथेच सोडून दिले. याबाबत सामाजिक सेवा केंद्र सांगली यांच्या पत्रावरून शहापूर पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले व त्यांच्या ताब्यात दिले. ही धक्कादायक घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती.
संबंधित महिला कोरोची येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास होती. २० नोव्हेंबर २०२० ला सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय हॉस्पिटलमध्ये तिने एका स्त्री नवजात बाळाला जन्म दिला. त्यानंतर २ डिसेंबर २०२० ला त्या बाळास तेथेच सोडून पळून गेली. याबाबतची माहिती हॉस्पिटलने तेथे नमूद पत्त्यानुसार शहापूर पोलिसांना दिली. शहापूरचे गोपनीय विभागाचे पोलीस शशिकांत ढोणे व पोलीसपाटील मारुती हेगडे यांनी शोध घेतला असता ही महिला कोरोचीत एका भाड्याच्या घरात राहत असल्याचे समजले. परंतु घर मालकास ओळखपत्राचा पुरावा दिला नसल्याने ती सापडत नव्हती. चौकशीत मिळालेल्या एका मोबाइल नंबरवरून सायबल सेलच्या मदतीने एस. डी. आर. घेऊन नेज (ता.हातकणंगले) येथील एका व्यक्तीचा शोध लागला. मात्र, त्या व्यक्तीच्या घरी चौकशी केली तेथेही संबंधित व्यक्ती आढळून आली नाही. दरम्यान, १६ जानेवारी २०२१ला ती कोरोची येथे आल्याचे समजताच पोलिसांनी महिलेस विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने बाळास सोडून गेल्याची कबुली दिली. तिला रविवारी भारतीय सामाजिक सेवा केंद्र सांगली यांच्या ताब्यात दिले.