कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीवरून शीतपेयाच्या रिकाम्या बाटलीतून २३५ ग्रॅम गांजा, मोबाइल आणि अन्य अंमली पदार्थ टाकण्याचा प्रयत्न करणा-या माय-लेकास कारागृह पोलिसांनी रंगेहाथ पकडून जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. रविवारी (दि. ७) सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयित महिला कोमल सुनील भोरे (वय ३८, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) हिला पोलिसांनी अटक केली असून, तिच्या अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आले.
कळंबा कारागृहाच्या भिंतीवरून मोबाइल आणि गांजा आत टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी सकाळी एक संशयित महिला तिच्या अल्पवयीन मुलासह कारागृहाच्या पूर्व बाजूला तटबंदीजवळ घुटमळत होती. तीन नंबरच्या सुरक्षा मनो-यावर कर्तव्य बजावत असलेले तुरुंग रक्षक अरुण बाबर यांनी महिलेच्या संशयास्पद हालचाली हेरल्या. ते तातडीने कारागृहाबाहेर तटबंदीजवळ गेले. त्याचवेळी भिंतीवरून बाटली आत फेकण्याचा प्रयत्न करणा-या महिलेला आणि तिच्या मुलाला रंगेहाथ पकडले.
संशयित महिला कोमल भोरे आणि तिच्या मुलाकडून जप्त केलेल्या बाटलीतून २३५ ग्रॅम गांजा, एक मोबाइल आणि पांढ-या रंगाचा अंमली पदार्थ मिळाला. जप्त केलेल्या मुद्देमालासह महिलेला जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. तुरुंग रक्षक अरुण सतीश बाबर (वय ३७, रा. चव्हाण कॉलनी, कळंबा रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.