लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी अद्याप पूर्णपणे कोरोना थांबलेला नाही. मात्र, कोरोनामुक्त गावांमध्ये राज्य शासनाच्या सूचनेनुसार इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुला-मुलींचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेता वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानादेखील आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले असले, तरी आईची काळजी कायम आहे.
कोरोनामुक्त असलेल्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यामध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास शासनाने शाळांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करीत कोल्हापूर जिल्ह्यातील काही कोरोनामुक्त गावांमधील शाळांनी दि. १५ जुलैपासून वर्ग सुरू केले आहेत. त्यादिवशी जिल्ह्यातील करवीर, भुदरगड, गगनबावडा, चंदगड तालुक्यातील एकूण ४३ शाळांमध्ये प्रामुख्याने इयत्ता दहावीचे वर्ग सुरू झाले. वर्ग प्रत्यक्षात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना असला तरी शिक्षणही महत्त्वाचे आहे. ते लक्षात घेऊन एकप्रकारे काळजावर दगड ठेवून पालकांनी आपल्या पाल्यांना सध्या शाळेत पाठविले आहे. शासन आदेशानुसार वर्ग सुरू करण्याबाबत ज्या ९४० शाळांनी इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे, त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू होणार आहेत.
पॉइंटर
जिल्ह्यातील एकूण शाळा : १०५४
प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्याच्या तयारीतील शाळांची संख्या : ९४०
सुरू झालेल्या शाळा : ४३
अद्याप बंद असलेल्या शाळा : १०११
काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!
प्रतिक्रिया
माझा मुलगा रेहान यावर्षी दहावीला आहे. ऑनलाइन शिक्षण फार प्रभावी होत नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार त्याचे वर्ग सुरू झाल्याने त्याला शाळेत पाठविले आहे. कोरोना असल्याने काळजी वाटते; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे. कोरोना नियमांचे पालन करून वर्ग सुरू आहेत.
-सानिया अत्तार, बापूरामनगर कळंबा.
माझी मुलगी राधिका दहावीच्या वर्गात शिकत आहे. हे वर्ष महत्त्वाचे आहे. घरी बसून अभ्यास होत नाही. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वर्ग सुरू झाले हे चांगले आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत ती शाळेत जाते. त्यामुळे थोडी काळजी कमी झाली आहे.
-अर्चना बुरूड, मगदूम कॉलनी पाचगाव
हळदी येथील चौंडेश्वरी हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात माझा मुलगा साई शिकत आहे. सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळेत त्याचे वर्ग प्रत्यक्षात भरत आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यादृष्टीने शाळेत कोरोनाबाबतच्या नियमांच्या पालनाबाबत आवश्यक दक्षता घेतली जात आहे.
-जिवना वाडकर, बेनिक्रे, ता. कागल
चौकट
शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा!
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाला असला, तरी पूर्णत: थांबलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलावेत आणि अंघोळ करावी. कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
पॉईंटर
१) मास्क काढू नये
२) वारंवार हात साबणाने धुवावेत
३) सॅनिटायझरचा वापर करावा
४) सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे
५) घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी
फोटो (२००७२०२१-कोल-सानिया अत्तार (प्रतिक्रिया), अर्चना बुरूड (प्रतिक्रिया), जिवना वाडकर (प्रतिक्रिया)