कोल्हापूर : ‘आई’ या शब्दातील ताकद मोजता येत नाही. आईपण निभावणार्या माउलींच्या सन्मानार्थ लोकमत सखी मंच आयोजित संगीत मैफल रविवारी चांगलीच रंगली. गायन समाज देवल क्लब येथे ‘अंतरंग’ संस्थेच्या कलाकारांनी आईवरील एकापेक्षा एक गाणी सादर करुन उपस्थितांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने झालेला ‘वंदूया आईस...’ हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व गायन समाज देवल क्लबचे कार्यवाह अरुण डोंगरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात गायक महेश हिरेमठ यांच्या ‘सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबकेगौरी...’ तसेच ‘तुझी सेवा मानून घे आई, कुशीत घे...’ हे गीत सादर करून झाली. तसेच जगात पंढरीच्या विठू माउलीलाही आईचाच मान आहे. आई सागरात आहे. तसेच आई परमेश्वरात आहे; म्हणून ‘विठू माउली तू माउली जगाची...’ हे सादर झालेले गीत सर्वांना भावले. शब्दसुरांच्या झुल्यावर मातृत्व उलगडणारे ‘आईसारखे दैवत सार्या जगतात नाही...’ हे गीत शुभांगी जोशी यांनी सादर केले. तर ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यस्वरूप आई’ हे गीत सोनाली कापसे यांनी सादर करुन उपस्थितांची टाळ्यांच्या गजरात दाद मिळविली. महेश हिरेमठ यांनी ‘हंबरून वासरांना चाटते जवा गाय...’ ही वºहाडी कविता सादर केली. ‘जखमेवर हळद लावताना झोंबणार म्हणून ओरडणारे लहान बालक’ यावर ‘ते झोंबणं शोधतंय...’ ही नाना पाटेकर यांची कविता शुभदा हिरेमठ यांनी सादर केली. त्यावर महेश हिरेमठ यांनी गायनाने साज चढविला. त्यांनी ‘कितनी अच्छी मेरी मॉँ भोली, ओ मॉँॅ, ओ मॉँ’ हे हिंदी गीत सादर करीत उपस्थितांना ठेका धरायला लावला. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या सोहळ्यात आईला मुलाबद्दल सर्व काही माहीत असते, यासाठी ‘मैं कभी बतलाता नहीं अंधेरे से डरता हूॅँ ना मॉँ, तुझे सब है पता ना मॉँ’ हे गीत सादर केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...’ हे गीत मातृभूमीसाठी सादर केले. या कार्यक्रमाची सांगता ग. दि. माडगूळकर यांच्या ‘तुझ्या वंदितो पावलासी, दिला जन्म तू विश्व हे...’ या गीतगायनाने करण्यात आली. शुभदा हिरेमठ यांनी सुरेख निवेदन केले. आशा माळकर यांनी स्वागत केले. तबला व ढोलकी साथ धीरज वाकरेकर, तालवाद्ये महेश कदम यांनी, तर सिंथेसायझरची साथ धनंजय कदम यांनी दिली. ध्वनिव्यवस्था श्रीधर जाधव व व्यवस्था स्वरूपा डोईफोडे यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)
अंतरंगातून उलगडले आईचे जीवनगाणे... ‘मदर्स डे’ : ‘अंतरंग’च्या कलाकारांनी उपस्थितांची जिंकली मने
By admin | Published: May 12, 2014 12:30 AM