कोल्हापूर : देवकर पाणंद परिसरातील दर्शन शहा खून खटल्याच्या सुनावणीला मंगळवारपासून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सुरुवात झाली. न्यायालयात साक्ष देताना दर्शनचे कपडे पाहून आईचा कंठ भरून आला. तिने केलेल्या आक्रोशाने उपस्थित वकिलांसह पक्षकारांचे डोळे भरून आले. या प्रसंगाने न्यायालयातील वातावरण काही काळ भावनिक झाले. दर्शनचे कपडे, सुरा, चिठ्ठीचा लखोटा, आदी वस्तू दर्शनची आई स्मिता शहा यांनी ओळखल्या. अत्यंत संवेदनशील वातावरणात पार पडलेली ही सुनावणी तीन दिवस चालणार आहे. पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २५ डिसेंबर २०१२ रोजी देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २४, रा. शुश्रूषा कॉलनी) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक यशवंत केडगे यांनी परिस्थितिजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी ३० साक्षीदारांचे जबाब घेऊन, तपास पूर्ण करून एप्रिल २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीला मंगळवारपासून प्रारंभ झाला. सुरुवातीला आरोपीचे वकील पीटर बारदेस्कर यांनी चांदणे याची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार असून, खटला तहकूब ठेवावा, यासंबंधी सुप्रीम न्यायालयात याचिका दाखल करण्यास मुभा द्यावी, अशी विनंती केली. त्यास विशेष सरकारी वकील निकम यांनी हरकत घेत खटल्याला उशीर झाला आहे, तो सुरू करावा, अशी विनंती केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश बिले यांनी आरोपीची मागणी फेटाळून खटल्याला सुरुवात केली. सरकारी वकील निकम यांनी सर्वप्रथम दर्शनच्या आई स्मिता शहा यांची साक्ष घेतली. ती सुरू असताना निळा हाफ शर्ट, निळी जीन्सची पॅँट, चप्पल त्यांना दाखवून ‘हे कपडे कोणाचे आहेत, हे आपण ओळखता का?’ असा प्रश्न निकम यांनी केला. कपडे पाहताच त्यांचा कंठ भरून आला. ‘माझ्या दर्शनचे कपडे आहेत, साहेब...’ असे म्हणत त्याच्या आठवणीने त्यांनी हंबरडा फोडला. एकुलत्या मुलाचे छत्र हरवून बसलेल्या मातेची केविलवाणी अवस्था पाहून न्यायालयातील वातावरण भावनिक झाले. उपस्थित काही वकिलांनी त्यांना सावरत, धीर देत शांत केले. त्यानंतर खुर्चीवर बसवून त्यांची साक्ष घेण्यात आली. (प्रतिनिधी)
‘दर्शन’चे कपडे पाहताच आईचा आक्रोश
By admin | Published: August 03, 2016 1:08 AM