कोल्हापूर : शिनोळी (ता. चंदगड) येथील लक्ष्मी मॅन्युफॅक्चरिंगचे मालक आकाश उदय घोरपडे या स्टील कारखानदारांकडून दहा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (वय ३८, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) व त्याचा पंटर समीर शिनोळकर (३३, रा. यशवंतनगर, कार्वे, ता. चंदगड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. सळी घेऊन जाणाऱ्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी शिंदे याने पंटरमार्फत पैशाची मागणी केल्याची तक्रार घोरपडे यांनी केली होती. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी : घोरपडे यांचा शिनोळी औद्योगिक वसाहतमध्ये सळी तयार करणे व विक्रीचा व्यवसाय आहे. या कारखान्यात तयार झालेला माल ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ट्रकमधून पाठविला जातो. यासाठी घोरपडे यांच्या मालकीच्या असणाऱ्या चार ट्रकचा ते वापर करतात. सळी घेऊन जाणाऱ्या या ट्रकवर कारवाई करू नये, यासाठी व अन्य ट्रकवरही कारवाई न करण्यासाठी सहायक मोटार परिवहन निरीक्षक प्रशांत शिंदे यांनी खासगी एजंट (पंटर) समीर शिनोळकर याच्यामार्फत दहा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारखान्याच्या कार्यालयात सापळा रचून लाचलुपत विभागाने कारवाई केली. प्रशांत शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पुण्यातील पोलीस उपधिक्षक उदय आफळे, उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीस कॉस्टेबल श्रीधर सावंत, अमर भोसले, आदींनी सहभाग घेतला.
मोटार वाहन निरीक्षक लाचप्रकरणी जाळ्यात
By admin | Published: April 29, 2015 12:50 AM