कोल्हापूर : शिवाजी पेठेतील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा १६ फेबु्रवारी रोजी महास्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी कोअर कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.महाराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजमधील १९६० ते २०१९ या कालावधीमधील माजी विद्यार्थ्यांचा महास्नेहमेळावा होणार आहे. माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन आहे. मेळाव्याला जास्तीत-जास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, या उद्देशाने रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र हायस्कूल येथून रॅलीला सुरुवात झाली. यानंतर निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, जुना वाशी नाका, लाड चौक, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, सीपीआर चौकमार्गे दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सांगता झाली.
यावेळी संस्थेचे संचालक आर. डी. पाटील, मुख्याध्यापक ए. एस. रामाणे, उपमुख्याध्यापक ए. एन. जाधव, उपप्राचार्य यू. आर. आतकिरे, पर्यवेक्षक यू. एम. पाटील, के. ए. ढगे, कोअर कमिटीचे नगरसेवक शेखर कुसाळे, विश्वजित शिंदे, प्रताप जाधव, रोहित भोईटे, संदीप पाटील, सौरभ सरनाईक, उदय देसाई, अजित दळवी, अभिजित नरके, सत्यजित पोवार, अनुयश पाटोळे, सौरभ पाटील, नीरज थोरात, आदी उपस्थित होते.
गुलाबी फेटे आकर्षणमोटारसायकल रॅलीमध्ये माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी गुलाबी फेटे घालून सहभाग नोंदविला. एकत्र सेल्फी घेण्यात आली. ४० वर्षांपूर्वीचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.