शिरोली : एकीकडे काही विघ्नसंतोषींकडून डोंगरांना आगी लावून तेथील वृक्षसंपदा नष्ट करण्याचा विखारी प्रकार घडत असला तरी हेच डोंगर पुन्हा हिरवाईने नटवण्यासाठीही काही पर्यावरणवादी संस्था मोठ्या हिमतीने कार्य करताना दिसत आहेत. सादळेचा डोंगरही हिरवाईने नटवण्यासाठी पेठवडगाव येथील योग सेवा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात योग सेवा फाउंडेशनच्यावतीने ८०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून योग सेवा फाउंडेशनच्यावतीने या डोंगरावर वृक्षारोपण सुरू आहे. उभ्या डोंगरात वृक्षारोपणासाठी खड्डे करून पिंपळ, वड, चिंच, लिंब अशा वेगवेगळ्या जातींच्या ८०० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार यावेळी तरुणांनी केला. पेठवडगाव येथील तरुण एका आठवड्यापासून दररोज सकाळी सहा वाजता डोंगरावर जाऊन वृक्षारोपण करत आहेत. यामध्ये युवक सेवा फाउंडेशनचे राजेंद्र जाधव, किरण चौगुले, महेश पाटील, अभिजीत मनेर यांच्यासह कार्यकर्त्याचा समावेश आहे.
फोटो : ०९ सादळे डोंगर
सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना पेठवडगाव येथील योग सेवा फाउंडेशनचे कार्यकर्ते.