लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या राजर्षि शाहू छत्रपती विद्यानिकेतनमध्ये सुरू असलेले कोविड सेंटर इतर ठिकाणी हलवा, अशी मागणी पालकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. येथे अध्यापन बंद असल्याने परिसरातील ३७० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
कोविड सुरू झाल्यापासून गेली पावणेदोन वर्षे येथे शासनाच्यावतीने कोविड सेंटर सुरू केले आहे. ग्रामीण भागात अनेक शाळा सुरू आहेत. मात्र, गेल्या पावणेदोन वर्षापासून या शाळेत कोविड सेंटर असल्याने अध्यापन होऊ शकत नाही. याबाबत पालकांची बैठक झाली, येथे रुग्ण कमी आहेत. येथील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता, हे सेंटर इतर ठिकाणी हलवावे. येथे सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्याबाबत पालक आग्रही आहेत. ऑनलाईन शिक्षणातून विद्यार्थ्यांना समजत नसल्याने नियमित अध्यापन सुरू करण्यासाठी पालकांचा आग्रह आहे. यासाठी येथील कोविड सेंटर इतर ठिकाणी हलवावेे, अशी मागणी पालकांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.