कोल्हापूर : महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या वतीने विभागीय कार्यशाळा येथील प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळा येथे रविवारी दुसऱ्या दिवशी निदर्शने करण्यात आली.याप्रसंगी बोलताना सेनेचे विभागीय सचिव के. एन. पाटील म्हणाले, ताराबाई पार्क येथील विभागीय कार्यशाळेत सध्या भोंगळ कारभार सुरू आहे. या ठिकाणी आलेल्या बसेस स्वच्छ न करता व न धुता कामकाजास घेणे, बसचे काम व कामकाज न तपासता, जॉब कार्ड न लावता बस कामास देणे, बॉडी कंडिशन न तपासता राज्य परिवहन बसेस कामकाजाआधी रंगविणे असे प्रकार घडत असून बसेसचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असून, प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यात अडचणी येत आहेत. याबाबत वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणी दखल घेत नाहीत. कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे; त्यामुळे आम्ही नाइलाजास्तव हे आंदोलन करीत आहोत.रविवारी दुपारी १२.३० वा व ४.३० वाजता आंदोलन करण्यात आले. हे प्रश्न जर तत्काळ सोडविले नाहीत तर बुधवारी (दि. ८) विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.विभागीय अध्यक्ष प्रवीण म्हाडगुत, कार्याध्यक्ष रवींद्र परांडेकर, आगार अध्यक्ष सुदेश कदम, आगार कार्याध्यक्ष अनिल सरदेसाई, सचिव टी. इचलकरंजीकर, दर्शना सपाटे, मनीष हंकारे, शुभांगी आढाळी, प्रतिमा घाटगे, राजू राबाडे, परमेश्वर वाकोडे, राज चावरे, आदींसह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख मागण्या....
- कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य १०० रुपये दंड करण्यात आला आहे. तो रद्द करणे.
- यांत्रिक कर्मचारी लेखनिक पदाकरिता न वापरण्याच्या महाव्यवस्थापकांच्या परिपत्रकाची पायमल्ली करणे.
- कारागीर यांत्रिक कर्मचाऱ्यांना (डेपो आॅथॉरिटी) कार्यशाळांमध्ये बस चालविण्याचा परवाना सक्तीचा करणे.
- मटेरिअलचा अपुरा पुरवठा, ज्यामुळे बसेसचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत आहे.