गडहिंग्लज : आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर शुक्रवारपासून ठिय्या मांडून आत्मक्लेश आंदोलन सुरू करण्यात आले आहे.धरणग्रस्तांना लाभ क्षेत्रात दिलेल्या जमिनीला भोगवटादार वर्ग १ अशी नोंद करावी, ताबा न मिळालेल्या जमीन वाटपाचे आदेश रद्द करून ज्यांना जमीन हवी त्यांना पर्यायी जमीन द्यावी, त्यांच्यावर पॅकेज घेण्याची सक्ती करू नये, जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना लिंगनूर येथील नियोजित भूखंडाचे वाटप करावे, संकलन दुरूस्ती तात्काळ करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, श्रीराम चौगुले, बजरंग पुंडपळ, सदाशिव शिवणे, नामदेव पोटे, शंकर पावले, रावसाहेब पोवार, सखाराम कदम, आनंदा बाबर, महादेव खाडे, सचिन पावले, आनंदा पावले आदी सहभागी झाले होते. दरम्यान, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देवून धरणग्रस्तांना पाठिंबा दिला.
थोबाडीत घेवून आत्मक्लेश!पहिल्या दिवशी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात सहभागी धरणग्रस्तांनी स्वत:च्या गालावर थोबाडीत मारून घेवून आत्मक्लेश करून घेतला.