कोल्हापूर : आॅनलाईन व्यापाराविरोधात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजच्यावतीने बुधवारी सकाळी बिंदू चौकात धरणे आंदोलन करुन निदर्शने करण्यात आली. ‘गो बॅक, आॅन लाईन व्यापार हटवा- व्यापार वाचवा’ अशा घोषणा दिल्या. कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे हे आंदोलन करण्यात आले.अमेझॉन या आॅनलाईन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस हे बुधवारी भारत भेटीवर येत असून ते आॅनलाईन कंपनीच्या काळ्या कर्तुत्वावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आॅनलाईन कंपन्यांच्या व्यापारास विरोध म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभरात सर्व राज्यातील शहरात कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सच्यावतीने काळे झेंडे दाखवून हल्लाबोल धरणे आंदोलन, निदर्शने करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार बुधवारी बिंदू चौकात कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीजच्यावतीने धरणे आंदोलन करत निदर्शने करण्यात आली.आंदोलकांच्या हातात हल्लाबोल, गो-बॅक असे काळ्या रंगातील फलक होते. तर आॅनलाईन व्यापार हटवा, व्यापार वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या. काळे झेंडेही दाखविण्यात आले. या आंदोलनात ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे, माजी अध्यक्ष आनंद माने, प्रदीपभाई कापडीया तसेच संजय पाटील, धनंजय दुग्गे, अजित कोठारी, वसंतराव देशमुख, हरिभाई पटेल, राहूल नष्टे, वैभव सावर्डेकर, संभाजीराव पोवार, धैर्यशील पाटील, प्रशांत शिंदे आदींचा सहभाग होता.