किणी : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध ३२ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने टप्प्याटप्प्याने उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून जिल्हाभर करण्यात येत असलेल्या आंदोलनात सहभागी होत किणी (ता. हातकणंगले) येथील किणी हायस्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सोमवारी काळ्या फिती लावून दैनंदिन कामकाज करत आंदोलन केले.
जुनी पेन्शन योजना लागू करणे, १०-२०-३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला व दुसरा हप्ता जमा करणे यासह विविध ३२ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन केले जात आहे. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून छेडण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता करून शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी किणी हायस्कूलचे अध्यापक विजयकुमार कुंभार यांनी केली आहे.
फोटो ओळी - सोमवारी झालेल्या निषेध आंदोलनात किणी हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.