लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना अधिकारी व कर्मचारी यांच्या सोयीसाठी इतरत्र हलविण्याचा घाट काही अधिकार्यांनी घातला आहे. त्यामुळे कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होणार आहेत. हे कार्यालय अन्यत्र हलविल्यास सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष धोंडिबा कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
इचलकरंजी व हातकणंगले तालुक्यातील चौदा हजार कामगार या योजनेचा लाभ घेत आहेत. या कामगारांकडून मासिक चार टक्के वर्गणीच्या माध्यमातून दरमहा अडीच ते पावणेतीन कोटी रुपये विमा मंडळाकडे जमा होतात. परंतु त्या तुलनेत सेवा व सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत संघटनेने अनेकवेळा आंदोलने केली आहेत तरीही अद्याप पुरेसे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली नाही. प्रभारी अधिकाऱ्यांकडेच पदभार सोपविला आहे.
त्याचबरोबर कार्यालयाच्या डागडुजीचा प्रश्न निर्माण करत या अधिकाऱ्यांनी नगरपालिकेशी फक्त कागदी घोडे नाचवून नगरपालिका काहीच करत नाही, अशी वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत. अशा काही अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे हे कार्यालय इतर ठिकाणी हलविण्याचा घाट घालण्यात आला आहे. कार्यालय बसस्थानकापासून लांबच्या अंतरावर हलविल्यास कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे कार्यालय अन्यत्र हलवू नये तसेच कामगारांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, वैद्यकीय कर्मचारी पुरेशा प्रमाणात नेमणूक करावी. या रुग्णालयाची इमारत नगरपालिकेने तत्काळ दुरूस्त करून तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी सर्व श्रमिक संघटना सहकार्याच्या भावनेने मदत करेल. परंतु हे कार्यालय इतरत्र ठिकाणी हलविल्यास आंदोलनाचा इशारा दिला. पत्रकार परिषदेस सुरेश पाटील, प्रकाश कांबरे, सुनील बारवाडे, अमित वरुटे, वसंत हापटे, आनंद कांबळे, आदी उपस्थित होते.
(फोटो) २९१२२०२०-आयसीएच-०३ (ईएसआय रुग्णालयाची इमारत)