कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे शुक्रवार (दि. ११) पासून आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.गेल्यावर्षी १२ वीच्या परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाशी चर्चा केली. त्यानंतर निर्णय घेतले परंतु, घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी केली नाही.
आंदोलन करूनदेखील शासन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या आणि प्रश्नांबाबत गंभीर नाही; त्यामुळे महासंघाने यावर्षीदेखील टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय मुंबर्ई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेतला. त्याप्रमाणे या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शुक्रवारी (दि. ११) दुपारी सर्व तहसीलदारांना तालुक्यातील संघाचे प्रतिनिधी, शिक्षक हे मागण्यांचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती संघाचे विभागीय सचिव प्रा. अविनाश तळेकर यांनी दिली.
आंदोलनाचे पुढील टप्पे
- दि. १८ जानेवारी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन'
- दि. ३० जानेवारी : शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मूक मोर्चा
- या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर फेब्रुवारीत बाराव्या परिषदेदरम्यान असहकार आंदोलन