कुरुंदवाड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमावा या मागणीसाठी आयुब पट्टेकरी यांनी सोमवारी हलगी वाजवून दवाखान्याला टाळे ठोक आंदोलन केले. मात्र, १५ आॅक्टोबरपर्यंत तात्पुरत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णालयांतर्गत कुरुंदवाड आरोग्य केंद्रात बारा गावांचा समावेश आहे.याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. याची दखल घेऊन सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास पट्टेकरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत रुग्णालयाला कुलूप ठोकण्यासाठी आरोग्य केंद्रात आले.यावेळी तालुका वैद्यकीयअधिकारी पी. एस. दातार यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत चार वैद्यकीय अधिकारी सेवा देणार असल्याचे लेखी नियुक्ती आदेश दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. १६ आॅक्टोबरला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमला नाही, तर आरोग्य केंद्राला टाळे ठोकणार असल्याच्या इशाऱ्याचे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. पुजारी यांना देण्यात आले. आंदोलनात दिलीप आवळे, अनिल वाले, रियाज बरगे, सुजर पट्टेकरी, सुमेर बागवान, गौतम ढाले, आप्पा नाईक, पप्पू तहसीलदार, महादेव भंडारे, इंदिरा कोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)
कुरुंदवाडमध्ये हलगी वाजवून आंदोलन
By admin | Published: October 06, 2015 12:51 AM