लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदाेली अभयारण्यग्रस्त नागरिकांनी बुधवारी आपल्या वसाहतीत घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. कोरोनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिक संख्येने नागरिक येण्यास बंधन येत असल्याने येथे ५० लोकांची उपस्थिती व आपापल्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा हा अभिनव पर्याय निवडला आहे.
धरण व अभयारण्यासाठी हक्काचे घर व जमिनी जाऊन कित्येत वर्षे झाली तरी या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही, त्यांना जमिनींचे वाटप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनी नागरिकांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत वनविभाग, पाटबंधारे, जिल्हा परिषद व महसूलच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक लावावी, असे पत्र देणार असल्याचे सांगितले, तसेच खा. धैर्यशील माने व डॉ. भारत पाटणकर यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिल्हा प्रमुख मारुती पाटील, पांडुरंग कोठारी, आकाराम झोरे, कोंडिबा पोवार, बाळू पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
---
फोटो स्वतंत्र पाठवला आहे.
--