आंबा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी दीड तास धरणे धरून येथील बेशिस्त कारभाराबात डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. रुग्णालयातील अस्वच्छता, गैरहजर कर्मचारी, रिक्त पदे, औषधपुरवठा व सेवेतील हेळसांडपणाबाबत सरपंच प्रेरणा बेंडके, उपसरपंच दत्तात्रय पाटील, सदस्य बासुजी गद्रे, नीलेश कामेरकर, दत्तात्रय भोसले, प्रकाश अस्वले, अजिंक्य बेर्डे, बबन अस्वले यांनी हंगामी वैद्यकीय अधिकारी ए. पी. गवळी यांना जाब विचारला. दरम्यान, ‘लोकमत’मधील वृत वाचून सकाळपासून सर्व यंत्रणा बाटल्या, चुली व खोल्यांच्या स्वच्छतेत व्यस्त होती. आकस्मिक रुग्णालयात घुसलेल्या आंदोलकांनी तालुका व जिल्हा अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलवा, अन्यथा रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला. यावेळी तालुक्याचे प्रभारी संपर्क अधिकारी माळी यांच्याशी सदस्यांनी चर्चा केली, तेव्हा मी कालच चार्ज घेतल्याचे सांगून त्यांनी बाजू मारली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी आडकेकर यांच्याशी सरपंच बेंडके यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी आठवडाभरात रिक्त डॉक्टर्स, आरोग्य सेवक व नर्सची (एन.आर.एच.एम.) पदे भरून अंधाधुदी कारभारावर अंकुश ठेवला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान जिल्हा अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. नांदरेकर तालुका अधिकाऱ्यांसह दुपारी रुग्णालयात दाखल झाले व येथील काराभाराबात नाराजी व्यक्त करीत, आठवडाभरात येथील सेवेत शिस्त लावण्यासाठी तालुका अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.रुग्णालयाची तपासणीडॉक्टरांच्या रिक्त पदांची भरती, व्यसनी व दांड्या मारणाऱ्या शिपायांची बदली करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. तसा ग्रामपंचायतीचा ठराव वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत असल्याचे सदस्य बासूजी गद्रे यांनी स्पष्ट केले. रुग्णालयाची तपासणी करताना तरुणांना प्रसूतिगृहात कवड्या जातीचा साप आढळला. मोनेरा फाउंडेशनचे सर्पमित्र प्रमोद माळी व निखिल कोलते यांनी सापाला पकडून अस्वच्छतेचा परिणाम आंदोलकांपुढे उघड केला.
आंबा आरोग्य केंद्रात ग्रामस्थांचे धरणे आंदोलन
By admin | Published: September 08, 2015 11:32 PM