भारत पाटीलमहाराष्ट्र शासनाने महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरणासाठी महिला स्वयंसाहाय्यता बचत गट ही नवीन संकल्पना आणलेली होती. यामध्ये गावोगावी महिलांचे बचत गट तयार करणे व तो बचत गट बँकेशी जोडणे हे पहिल्या टप्प्यामध्ये नियोजन होते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (ऊफऊअ) व महिला बालकल्याण या विभागांच्यावतीने अध्यक्ष अण्णासाहेब नवणे व उपाध्यक्ष बळीराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली व सी.ई.ओ. प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदशर्नाखाली प्रकल्प संचालक आनंद पुसावळे हे या कार्यक्रमाचे समन्वयक होते. दहा हजार बचत गटांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. माझ्या पन्हाळा तालुक्याला १८00 गटांचे टार्गेट दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात ‘महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता महिला बचत गट’ या नावाने ही मोहीम राबविली होती. शासनाच्या नवीन योजना व नवीन परिपत्रके वाचायची व त्यावर अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करायची मला सवयच लागली होती. यामुळे शासनपातळीवर कोणतीही नवीन योजना तयार करताना खूप अभ्यास केला जातो, याची मला जाणीव झाली होती. या सगळ्या शासकीय योजना लोकांपर्यंत वाडी-वस्त्यांवर पोहोचविणे ही खरी स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असते. यासाठी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समन्वयाची खूपच गरज असते; पण अजूनही आपल्या देशात असे घडत नाही. हीच खरी मोठी शोकांतिका आहे. शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे व गावागावांत नवीन योजनांचा विस्तार करणे ही तालुक्याचा सभापती या नात्याने माझी मुख्य जबाबदारी आहे, ही जाणीव मला नक्कीच झालेली होती. बचत गट या संकल्पनेची उद्दिष्ट्ये समजावून घेतल्यानंतर ग्रामीण भागातील महिलांच्या उत्कर्षासाठी ही एक नवीन संधी आहे. तसेच महिलांना कार्यरत राहण्यासाठी एक नवीन व्यासपीठ मिळू शकते. विकासाच्या प्रवाहात महिलांची सक्रियता राहू शकते. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची एक नामी संधी या मोहिमेत मिळू शकते. या संकल्पनेमुळे ग्रामीण महिला स्वावलंबी व समृद्ध बनू शकतात. ग्रामीण भागात परिवर्तन घडू शकते. यामुळे मी पन्हाळा तालुक्यात ही लोकचळवळ निर्माण करता येईल का? यासाठी सर्वांशी संवाद साधत होतो. आम्ही सगळ्यांनी यासाठी नेटके नियोजन केले होते. दोन हजारांपेक्षा जास्त बचत गट तालुक्यात स्थापन करून जिल्ह्यात एक उच्चांक निर्माण करण्याचा आम्ही सगळ्यांनी संकल्प केला होता. विजयसिंह जाधव यांच्याकडेच त्यावेळी इऊड चा पदभार होता. बचत गट स्थापन करताना दहा ते वीस महिलांचा गटात समावेश आवश्यक होता. स्वयंसाहाय्यता बचत गटामुळे महिलांचे संघटन, दारिद्र्य निर्मूलन व महिलांचे आर्थिक, सामजिक, शैक्षणिक व आरोग्याविषयी महिलांचे सक्षमीकरण हा मुख्य हेतू साध्य होणार होता. आपल्या भारत देशात बचत गटाची चळवळ ‘म्हैसूर रिसेटलमेंट अँड डेव्हलपमेंट एजन्सी (मायराडा)’या संस्थेने प्रथम सुरुवात केली होती. नाबार्डनेदेखील बचत गटाचे मॉडेल तयार करून ग्रामीण भागात प्रयोग सुरू केले होते. १९७0 च्या दशकात बांगलादेशात डॉ. मोहम्मद युनूस यांनी महिलांची बचत गट मोहीम सुरू केली होती. ‘मायक्रो क्रेडिट स्कीम’ म्हणून ही बांगलादेशात आर्थिक क्षेत्रात ही एक लोकचळवळ निर्माण झालेली आहे. यामुळे महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने उभे राहता आले आहे. गटातील प्रत्येक सभासदांनी आपली ठराविक बचत गोळा करणे व ती साठविलेली रक्कम सभासदांना त्यांची आर्थिक गरज सोडविण्यासाठी त्यांना कर्ज स्वरूपात मदत करणे, यामुळे कौटुंबिक गरज व व्यवसाय वृद्धी या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावांत आम्ही विशेष महिलांच्या ग्रामसभा आयोजित केल्या होत्या.हळदी कुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आम्ही महिलांना बचत गटांचे महत्त्व, उद्दिष्ट व फायदे यांविषयी प्रबोधन करीत होतो. सरपंच संघटना, ग्रामसेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मनापासून सहभाग आम्हाला त्यावेळी लाभला होता. मालेच्या सरपंच राधाबाई चौगले, जाखलेच्या उपसरपंच रंजना पाटील, पैजारवाडीच्या रूपाली चिले व संगीता यादव यांनी त्यावेळी खूप प्रभावी काम केले होते. मी जवळजवळ सर्व गावांच्या बैठकींना हजर राहिलो होतो. आम्ही त्यावेळी तालुक्यातील दोन हजारच्या वर बचत गटांची स्थापना केली होती. जवळजवळ चाळीस टक्के बचत गट एका वर्षात आम्ही बँकेशी जोडले होते. नाबार्डचे अधिकारी घाडगे यांचीही त्यावेळी आम्हाला मौलिक मदत झालेली होती. जिल्हा परिषदेच्या मिटिंगमध्ये या अलौकिक कामाबद्दल पन्हाळा तालुक्यातील सर्वांचे मनस्वी अभिनंदन करण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी अकरा हजारच्या वर महालक्ष्मी स्वयंसाहाय्यता बचत गट स्थापन झाले होते. हा एका वेगळा नावलौकिक आपल्या कोल्हापूर जिल्ह्याने मिळविला होता. सर्व गट बँकेशी जोडून त्यांना आता व्यवसायात्मक प्रशिक्षण देण्याची गरज होती.(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)
महिला बचत गट एक चळवळ ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:26 AM