कृष्णा सावंत । पेरणोली : आजरा तालुक्यात कोरोनामुक्त गावांमध्ये मराठी शाळा सुरु करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याला शिक्षक संघटनांकडून प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणखी नुकसान होऊ नये म्हणून कोरोनामुक्त गावातील पालकांमधून शाळा सुरु करण्याबाबत आग्रह होत आहे.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अनेक तरूण व वृद्धांना जीव गमवावा लागला आहे. परंतु, लहान मुलांमध्ये याचे अल्प प्रमाण असल्याचे आढळून आले आहे. कोरोना असलेल्या गावात मुलंही गावातून मास्क लावून फिरताना दिसतात. त्यामुळे या मुलांसाठी कोरोनाचे सर्व नियम पाळून करून शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याबाबतचा मतप्रवाह आहे.
दरम्यान, आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांच्याकडे शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने शाळा सुरू करण्याबाबत मागणी केली आहे. परंतु, शासन निर्णय नसल्यामुळे वाघ यांनी त्याला नकार दिला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावांनीच शाळा सुरू करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे.
चौकट : ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा
ऑनलाईन शिक्षणाकडे विद्यार्थी दुर्लक्ष करत आहेत. मोबाईलचा वापर इतर कारणासाठी केला जातो. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने पालक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त हिरवेबाजारप्रमाणे शाळा सुरू करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.