संतोष तोडकर-- कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराजांनी ११० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या मुस्लिम बोर्डिंग हाऊसमध्ये बुधवारी (दि. २७) मुस्लिम मराठी साहित्य संशोधन केंद्र सुरू झाले. आता येत्या २१ ते २३ मे दरम्यान कोल्हापूरला मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आहे. याचा फायदा मुस्लिम साहित्यिकांच्या मराठी भाषेतील योगदानाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना होणार आहे. तसेच मराठी साहित्यला नवी दिशा मिळणार आहे. आज महाराष्ट्रात सुमारे पाचशे ते सहाशे मुस्लिम लेखक आहेत. या सर्व लेखकांची किमान दीड ते दोन हजारहून अधिक ग्रंथसंपदा आहे. ही ग्रंथसंपदा अभ्यासकांना, संशोधकांना, वाचकांना एकत्रितपणे उपलब्ध होणे कठीण होते; परंतु या केंद्राच्या माध्यमातून ती खुली होत आहे. मुस्लिम मराठी साहित्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संशोधन केंद्राची स्थापना या केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. या केंद्रात सद्य:स्थितीला ४२५ लेखकांची सुमारे ५०० हून अधिक पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. यामध्ये सय्यद अब्दुल आला मौदुदी यांचे ‘गोशा’, प्रा. डॉ. मीर शेख यांचा ‘स्वातंत्र्य मागणारी उर्दू कविता’, प्रा. खुर्शीद अहमद यांचा ‘इस्लामचा शैक्षणिक दृष्टिकोन’, शब्बीर मुलाणी यांचे ‘दिव्य कुरअनची वैश्विकता’, ‘विश्वस्त समाजाचे’, ‘माझ्या गावचं गाणं‘, डॉ. अजीज नदाफ यांचे ‘शाहीर अमर शेख’ यासह वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यात व कालावधीत समाजाचे केलेले चित्रण, सार्वभौम मुस्लिम अस्मिता, जीवनशैली, सर्वसामवेशक इस्लाम संस्कृती, इतिहास , समस्या, भविष्यातील आव्हाने यावर अधारित कथा, कादंबरी, ललित वाड्:मय लेखनांचा समावेश आहे.या लेखकांनी उर्दू व मराठी या भाषेतील अंतर कमी करण्याबरोबरच मराठी साहित्यात आपला ठसा उमटविला आहे. संत साहित्याचे अभ्यासक यू. म. पठाण वगळता अन्य साहित्यिक मात्र मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे जाणवते. या सर्व लेखकांना हक्काचे व्यासपीठ या केंद्राच्या माध्यमातून मिळाले आहे. नव्या पिढीला साहित्याची, संशोधनाची आवड निर्माण व्हावी, नवोदित लेखकांच्या लेखनाचा दर्जा सुधारण्यासाठी कार्यशाळा, समाजजीवनातील लोकसाहित्य, जीर्ण झालेले ग्रंथ, हस्तलिखिते, कागदपत्रे जतन करून ते उपलब्ध करून देणे यासारखे उपक्रम राबवणार आहेत.मुस्लिम संतकवींची १५ व्या शतकापासून परंपरा१५ व्या शतकापासून मुस्लिम मराठी संत साहित्याची परंपरा आढळते. या कालखंडात सुमारे ४९ मुस्लिम मराठी संतकवी होऊन गेले. शहा मुंतोजी, ब्रहमणी, बाबा शेख महंमद, हुसेन अंबरखान, अलमखान अशा मोजक्याच संतकवींच्या रचना आज आहेत.
मुस्लिम मराठी साहित्याला चालना
By admin | Published: April 28, 2016 11:16 PM