कोल्हापूर : भाषा, धर्मांतील वैविध्य ही लोकशाहीची ओळख असून, ती कोणत्याही एका व्यक्तिमत्त्वावर अवलंबून नाही; पण सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकच अजेंडा राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो लोकशाहीच्या अंतास कारणीभूत ठरणार आहे. लोकशाहीची हुकूमशाहीकडे संक्रमणावस्था सुरू असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केले. भाई माधवराव बागल यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘भाई माधवराव बागल पुरस्कार’ किशोर बेडकिहाळ यांना प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते. बेडकिहाळ म्हणाले, केंद्रातील सत्तेचा अजेंडा हिंदुत्ववादाचा असल्याने कल्याणकारी लोकशाहीत अडथळे निर्माण होत आहेत. चौसाळकर म्हणाले, लोकशाहीपुढे विशिष्ट विचारांच्या शक्तीने आव्हान उभे केले आहे. विचारांचा पुढील संघर्ष लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीच केला जाईल. जागतिकीकरणामुळे बंदिस्त झालेल्या समाजाला परिवर्तनाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी समाजवादी विचारांची जरुरी आहे. जितेंद्र कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य. टी. एस. पाटील यांनी गौरवपत्र वाचन केले. अॅड. अशोकराव साळोखे यांनी आभार मानले. दरम्यान, बागल विद्यापीठातर्फे शाहू मिलसमोरील भाई बागल यांच्या पुतळ्यास उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. (प्रतिनिधी)
देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल
By admin | Published: May 29, 2016 1:05 AM