शरद यादवकोल्हापूर : राज्यातील सत्तेच्या सारीपाटाला सुरुंग लावत मुख्यमंत्र्यांची खुर्ची पटकावणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे हादरे कोल्हापुरातही जाणवू लागले आहेत. खासदार संजय मंडलिक यांच्यापाठोपाठ आता हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनीही शिंदेशाही जवळ केल्याने एकच खळबळ उडाली आहे; परंतु केवळ अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत आलेल्या व प्रवेशापाठोपाठ लोकसभेची बक्षिसी मिळविलेल्या माने यांच्यावर असा कोणता अन्याय झाला, की त्यांनी थेट ठाकरेंना सोडण्याचा निर्णय घेतला, याचे कोडे मात्र मतदासंघातील जनतेला उलगडेना झाले आहे.पुर्वीच्या इचलकरंजी व आताच्या हातकणंगले मतदारसंघाचे बाळासाहेब माने यांनी तब्बल २५ वर्षे, तर निवेदिता माने यांनी दहा वर्षांपूर्वी इचलकरंजी व आताच्या हातकणंगले मतदारसंघाचे लाेकसभेत नेतृत्व केले. हा सक्षम वारसा लाभलेल्या धैर्यशील माने यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवबंधन बांधत ‘मातोश्री’वर भगवा हातात घेतला.घराण्याचा वारसा तसेच चांगले वक्तृत्व यांमुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना लाेकसभेचे तिकीट देण्याचे वचन दिले. यावेळी भाजप-शिवसेनेची युती होती. राजू शेट्टी यांच्यासारख्या तगड्या नेत्यांना चितपट करण्यासाठी भाजपने या मतदारसंघात चांगल्या जोडण्या लावल्या होत्या; परंतु ठाकरे यांनी केवळ माने यांना उमेदवारीचा शब्द दिल्याने जास्त न ताणता भाजपने या मतदारसंघावरचा दावा सोडला. तेथेच धैर्यशील माने यांचा संसदेत जाण्याचा मार्ग सुकर झाला.२०१९ मध्ये धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी सेना-भाजपाचे कार्यकर्ते तसेच ‘स्वाभिमानी’तून बाहेर पडलेल्या नेत्यांनी रात्रीचा दिवस केल्याने कुणालाही अपेक्षित नसणारा निकाल या मतदारसंघात लागला व धैर्यशील माने हे जायंट किलर ठरले. गेल्या अडीच वर्षांत धैर्यशील माने हे ‘मातोश्री’चे जवळचे मानले जात होते. परंतु त्यांनीही ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केल्याने ठाकरेंचे नेमके काय चुकले, असा प्रश्न मतदारसंघात विचारला जात आहे. केवळ निवडून येण्याची हमी या एकसूत्री कार्यक्रमासाठीच धैर्यशील माने यांनी शिंदेशाहीचे तोरण बांधल्याचा सूर व्यक्त होत आहे.
दुसऱ्याच्या खांद्यावरून पंढरपूर
सन २०१९ मध्ये चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जोडण्या लावल्या; तसेच अर्थसाथही दिल्याने विशेष कोणतेही परिश्रम न घेता माने यांना विजय प्राप्त झाला. आताच्या नव्या राजकीय समीकरणात आवाडे, हाळवणकर, यड्रावकर, महाडिक, कोरे यांची साथ मिळणार व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा सोपान चढणे सहज शक्य होईल, असा कयास त्यांनी बांधल्याचे दिसते. गेल्या अडीच वर्षांत विशेष कोणतेही काम माने यांना करता आलेले नाही. त्याचा फटका बसू नये, याच हेतूने त्यांनी हे पाऊल टाकल्याचे दिसून येते.
फाटक्या माणसांना ताकद देणारा जिल्हाआजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास पाहिला तर शंकर धोंडी पाटील, के. एल. मलाबादे, सदाशिवराव मंडलिक, राजू शेट्टी, यशवंत एकनाथ पाटील, राजेश क्षीरसागर अशा सामान्य कार्यकर्त्यांना विधानसभा, लोकसभेत पाठवून जनतेने प्रस्थापितांना धडा शिकवला आहे. त्यामुळे मतदारसंघातील मोठ्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला म्हणजे लाेकसभेचे गणित जमलेच, अशा भ्रमात कोणीच राहण्याचे कारण नाही.
सांगा, उद्धव ठाकरे यांचे काय चुकले
सन २०१८ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रुकडी मतदारसंघातून माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांचा पराभव झाला होता. तरीसुद्धा २०१९ मध्ये प्रवेश केल्याबरेाबर उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांना लोकसभेचे तिकीट दिले. काही काळ त्यांना पक्षाचे प्रवक्ते केले, मातोश्रीवर सन्मानाची वागणूक दिली. एवढे सगळे करूनही केवळ अडीच वर्षांत माने हे शिंदे यांच्या छावणीत गेल्याने उद्धव ठाकरे यांचे नेमके चुकले काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीचा निकालधैर्यशील माने, शिवसेना ५,८५७७६राजू शेट्टी, स्वाभिमानी पक्ष ४,८९७३७९६०३९ मतांनी माने विजयी.