कोल्हापूर : गेली पंधरा वर्षे जनतेने सर्व सत्ता दिल्यानंतरही माजी पालकमंत्र्यांनी कोल्हापूरला अविकसित ठेवण्याचे काम केले, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी रात्री दसरा चौक येथे दहीहंडी कार्यक्रमात बोलताना केला. कोल्हापूरच्या जनतेने माजी पालकमंत्र्यांच्या हाती अगदी लहान वयात जिल्ह्यातील सगळी सत्ता दिली. त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत काय केले ते सांगावे, जर त्यांनी चांगली कामे सांगितली तर मी दहीहंडीची तीन लाखांची रक्कम त्यांना बक्षीस देईन, असे महाडिक यांनी जाहीर केले. आम्ही चांगले काम करत असतानाही कावीळ झालेल्या माजी पालकमंत्र्यांना सगळं पिवळंच दिसायला लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला.महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता थेट आरोप केले; परंतु पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र महापालिका, गोकुळ येथील सत्तेत मीही सहभागी असल्यामुळे त्यावर काही बोलणार नाही असे सांगत आमदार सतेज पाटील यांच्यावरील टीका टाळली. हा दहीहंंडीचा कार्यक्रम असल्याने तिथे राजकीय भाष्य करू नये, असे मला वाटत होते; परंतु महाडिक यांनी प्रचाराचा नारळच फोडल्याची टिप्पणीही पालकमंत्री मुश्रीफ यांनी केली.
दहीहंडीचा उद्घाटन समारंभ झाल्यानंतर खासदार महाडिक यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा ऊहापोह केला. शिरोली ते उचगाव फ्लायओव्हर, बास्केट ब्रीज, रेल्वेस्थानक सुशोभीकरण, विमानतळाचे अद्यावतीकरण, पायाभूत सुविधा अशा विकासकामांची माहिती दिली. महाडिक म्हणाले, थेट पाइपलाइनचा वनवास अजूनही संपलेला नाही, टोलमध्ये ढपले पाडल्याने शहरातील एकही रस्ता चांगला नाही. कचऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. त्यांनी कोल्हापूर अविकसित ठेवण्याचा प्रयत्न केला. केवळ भ्रष्टाचारातून सत्तेची मस्ती केली, असा आरोप त्यांनी केला.
अलीकडे माजी पालकमंत्री दंगलीबाबतचे भाकित करत असतात. ते भाकित करतात आणि कोल्हापुरात दंगली होतात. धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून होऊ लागले असल्याचा आरोपही महाडिक यांनी केला. टोलची पावती फाडल्यावरूनही त्यांच्यावर पुन्हा टीका केली.गोकुळने पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करून खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु हे महाविद्यालय त्यांच्या ग्रुपलाच देऊ नका, असे आवाहन महाडिक यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना केले.
महायुतीचे १० आमदार विजयी करा : महाडिककार्यक्रम दहीहंडीचा असला तरी महाडिक यांनी त्यामध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळच फोडला. जिल्ह्यातील सर्व १० जागा निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.