लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : आमच्या विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा त्यांना जिल्ह्यासाठी भरीव असे विकासकार्य करता आले नाही. सत्तेचा वापर केवळ स्वत:च्या विकासासाठी केला. आम्ही बास्केट ब्रिजची संकल्पना मांडली तेव्हा विरोधकांनी आमची ‘हवेतला ब्रिज’ अशी चेष्टा केली. आज हाच बास्केट ब्रिज उभारला जातोय याचा आनंद आहे, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता टीका केली.
ब्रास्केट ब्रिजच्या भूमिपूजन समारंभात खासदार महाडिक यांनी हा हल्लाबोल केला तेव्हा अशीच टीका करणारे खासदार संजय मंडलिकही व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार महाडिक म्हणाले, कोल्हापूरचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर पोहोचले आहे. राजकारणाच्या भानगडीत पडायला नको असे वाटत होते; पण महादेवराव महाडिक यांच्यामुळे राजकारणात आलो. ‘प्रामाणिकपणे लोकांची सेवा करा,’ हीच त्यांची शिकवण होती. २००४ व २००९ असा सलग दाेन वेळा पराभव झाला. २०१४ ला राष्ट्रवादीकडून निवडून आलो. भीत-भीत नितीन गडकरी यांच्याकडे गेलो. त्यांना बास्केट ब्रिजचे सादरीकरण केले. तेव्हा त्यांनी अवघ्या पाच मिनिटांत हा ब्रिज मंजूर केला. त्याच्या डिझाइनमध्येही त्यांनी बदल केला नाही. दुर्दैवाने २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला आणि या ब्रिजचे काम रखडले. तेव्हा आमच्या विरोधकांनी हवेतील ब्रिज कोठे गेला, असला कुठं ब्रिज असतोय का, अशी विचारणा करत खिल्ली उडविली.
महाडिक म्हणाले, अतिशय घाणेरडे राजकारण विरोधकांनी केले. बारा-तेरा वर्षे त्यांच्याकडे सत्ता होती, परंतु कोल्हापूरसाठी भरीव असे काही करता आले नाही. स्वत:च्या विकासासाठी सत्तेचा वापर केला. सगळ्या संस्था आपल्या ताब्यात पाहिजेत, अशी हाव त्यांना सुटली. प्रवेशातून डोनेशन मिळवून त्यांनी राजकारण केले, पण मी राजकारण न करता विकासासाठी कार्यरत राहीन.
खासदार संजय मंडलिक यांनी महाडिक यांच्या टीकेचा संदर्भ घेत निवडणूक काळात अशी टीकाटिप्पणी करायला मीही पुढे होतो; पण आज बास्केट ब्रिज होतोय याचा मला आनंद असल्याचे सांगितले.