कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक व भाजपचे आमदार अमल महाडिक हे एकत्रितपणे काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. सोमवारी रुईकर कॉलनीतील निवासस्थानी त्यासंबंधी प्राथमिक बैठक होऊन रणनीती निश्चित करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी रविवारीच या आघाडीबाबतचे सूतोवाच केले होते. हा प्रयोग गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतही काही ठिकाणी होण्याची चिन्हे आहेत.देशात व राज्यात सत्तेत असलेला भाजप कोल्हापूर जिल्ह्यांत मात्र महाडिक गटाची ‘बी’ टीम म्हणून काम करीत असल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. आताही जे दुसऱ्या फळीतील नेते भाजपमध्ये जात आहेत त्यामागेही माजी आमदार महादेवराव महाडिक यांचेच प्रयत्न आहेत. ‘आणखी दहा वर्षे आपण नमो..नमो..चा गजर करायचा’ असे ते आता उघडपणे सांगत आहेत. खासदार महाडिक यांनी मात्र गेल्या काही दिवसांत नोटा बंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदी यांना धारेवर धरले आहे. सोमवारच्या पक्षाच्या आंदोलनातही ते पुढे होते. त्याशिवाय पक्षाच्या व्यासपीठावरही ते आक्रमकपणे भाजपच्या विरोधात बोलताना दिसत होते. त्यामुळे खासदार पक्षात पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत होते; परंतु राष्ट्रवादीत सक्रिय होताना भाजपबरोबरशी लागेबांधेही ते तोडायला तयार नसल्याचे सोमवारच्या बैठकीमुळे स्पष्ट झाले. या बैठकीस ‘दक्षिण मतदारसंघातील अत्यंत विश्वासू’ अशा प्रमुख कार्यकर्त्यांना बोलाविले होते. त्यामध्ये काँग्रेसच्या विरोधात ताकदीने लढण्याचा निर्णय झाला. मग त्यासाठी सोयीनुसार महाडिक गट, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याची रणनीती निश्चित करण्यात आली. स्थानिक पातळीवर समझोता करून कुणी कुठल्या जागा लढवायच्या यासंबंधीचा निर्णय घेतला जावा असे ठरले.दक्षिण विधानसभा व नंतर झालेल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही खासदार महाडिक यांची भूमिका भाजपला पूरक अशीच राहिली होती. विधानसभा निवडणुकीत खासदारांच्या पत्नी भाजपचे उमेदवार अमल यांच्या प्रचारसभेत थेट सक्रिय होत्या. महापालिकेच्या निवडणुकीत खासदारांनी तीही कसर भरून काढली व राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवारांच्या पराभवासाठी कंबर कसली. त्यावेळीही आमदार मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांच्यावर थेट टीका केली होती. आताही या आघाडीची कुणकुण मुश्रीफ यांनाच पहिल्यांदा लागली आहे. या घडामोडींच्या मागे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे संदर्भ आहेत.
खासदार महाडिक भाजपसोबतच
By admin | Published: January 10, 2017 12:53 AM