कोल्हापूर : स्वच्छ हेतू आणि प्रामाणिकपणे आमरण उपोषण करून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेतल्या. यापुढील काळातही मराठा आरक्षणासाठी दिल्ली आणि राज्य पातळीवर जे जे करावे लागेल ते नक्की करेने. हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे, अशी स्पष्ट ग्वाही खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी येथे दिली. मी मराठा समाजाचा सेवक असलो तरी माझी भूमिका तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही. बहुजन समाजाचेही नेतृत्व करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणानंतर मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या. म्हणून गुरुवारी कोल्हापुरात त्यांचे भव्य मिरवणुकीने स्वागत केले. त्यानंतर भवानी मंडपात झालेल्या सभेत ते बोतल होते. संयोगिताराजे, मधुरीमाराजे, डॉ जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर समाजात निराशा आली. संयमाने त्यावेळची परिस्थिती हाताळली. आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारला समाजासाठी जे देणे शक्य आहे. ते मिळावे, यासाठी पाठपुरावा केला. मूक मोर्चाच्या माध्यमातून समाज बोलला, तुम्ही बोला, अशी लोकप्रतिनिधींना हाक दिली. सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. पण त्यांची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांपासूनही लपवून अचानकपणे आझाद मैदानात आमरण उपोषणाचा निर्णय घेतला.उपोषणाला सुरुवात केली. वैभवात वाढल्याने उपाशीपोटी राहिल्यामुळे उपोषणादरम्यान उपाशीपोटी राहावे लागल्याने प्रकृती खालावली. राज्यात तीव्र पडसाद उमटायला लागले. सरकारने सकारात्मकता दाखवत समन्वयाची चर्चा करून समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या. याची अंमलबजावणीही तातडीने सुरू झाली आहे. यापुढील काळात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दिल्ली आणि राज्य पातळीवरही जो संघर्ष करावा लागेल तो करणारच आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, अनेक वर्षापासून मराठ्यांचे नेतृत्व छत्रपती घराण्यांकडे आहे. यापुढील काळातही छत्रपती घराण्याने मराठा समाजातील बौद्धिक मागासलेपण घालवण्यासाठी प्रबोधनाचे नेतृत्व करावे. अजूनही मराठ्यांना दिल्लीचे राजकीय तख्त काबीज करता आलेले नाही. ती संभाजीराजेंनी काबीज करावे.यशवंत गोसावी यांनी प्रास्ताविकात मराठा समाजाच्या मान्य झालेल्या मागण्यांची माहिती दिली. पाच वर्षाचा शैार्य नाळे या बालमावळ्याने आणि शाहीर दिलीप सावंत यांनी शाहिरीने लक्ष वेधले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, उद्योजक व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, फत्तेसिंह सावंत, निलोफर आजरेकर, दिलीप देसाई आदीसह मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कुंडलीमुक्त विवाहाचे पालकत्व तुम्ही घ्या
‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा संदर्भ घेत ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार म्हणाले, मराठा समाज केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही तर बौद्धिकदृष्ट्याही मागास आहे. कुंडलीमुक्त विवाहासाठी वसंतराव मुळीक प्रयत्न करत आहेत. या समाज मोहिमेचे पालकत्व संभाजीराजे आणि पत्नी संयोगिताराजेंनी यांनी घ्यावे. त्यावर संभाजीराजे म्हणाले, माझा विवाह कोणतीही कुंडली न पाहता झाला आहे. माझ्या मुलासही मी हाच सल्ला दिला आहे. समाजासाठी अशा चांगल्या गोष्टींसाठी मी निश्चित पुढाकार घेईन.लोकसभेला पराभव झाला ते उत्तमच
सन २००९ मध्ये लोकसभेला माझा पराभव झाला ते उत्तमच झाले. पराभवानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. महाराष्ट्र पिंजून काढत मराठा, बहुजन समाजाला संघटित करता आले. राजर्षी शाहूचा रक्ताचा आणि विचाराचा वारस म्हणून हे काम निष्ठेने करून समाजाला न्याय मिळवून देता आला, असेही खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
लक्षवेधी आणि भव्य मिरवणूकढोल-ताशांचा अखंड गजर, हलगीचा कडकडाट, लेझीम आणि मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, वारकऱ्यांचे भजन, घोडा, हत्तीचा सहभाग अशा लक्षवेधी आणि भव्य अशी खासदार संभाजीराजे यांची विजयोत्सव आणि स्वागत मिरवणूक शिवाजी चौक ते भवानी मंडपापर्यंत निघाली.पुष्पवृष्टी अन् साखर, पेढे वाटप
शिवाजी चौकातून मिरवणूक भवानी मंडपात आल्यानंतर खासदार संभाजीराजे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. मंडपातील मंचापर्यंत फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या. साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांनी औक्षण करून स्वागत केले. फटाक्याची आतषबाजी करून आसमंत दणाणून सोडले. असे वातावरण पाहून संभाजीराजे भारावून गेले. त्यांनी आपल्या भाषणात लोकसभेची निवडणूक जिंकली असती तरी इतकी मोठी मिरवणूक निघाली नसती. करवीरकरांनी प्रचंड प्रेमापोटी मिरवणूक काढली, असे सांगितले व समाजासमोर ते नतमस्तक झाले.