कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांच्या निधीतून होत असलेल्या हणबरवाडी पूल-रस्त्याच्या कामाच्या निविदेत काय खोट आहे का, निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही ठेकेदाराची वर्क ऑर्डर का अडवून ठेवली आहे, ठेकेदाराला मुश्रीफ साहेबांना भेटायला का सांगत आहात, अशी प्रश्नांची सरबत्ती करत शिवसेनेचे (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांना धारेवर धरले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच या दोघांमध्ये जोरदार वाद झाल्यानंतर अखेर विभागाने ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिली.मुश्रीफ हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते आहेत. खासदार मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आहेत. त्यामुळे सत्तारूढ आघाडीतीलच दोन नेत्यांतील या वादाने अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली. पवार गट सत्तेत आल्यापासून आमची अडचण होत असल्याची जाहीर कबुली जमादार यांनी या वेळी दिली.
खासदार मंडलिक यांच्या निधीतून हणबरवाडी (ता. कागल) येथील पुलाचे काम मंजूर झाले असून त्याची निविदा जून महिन्यात प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला वर्क ऑर्डरच दिलेली नाही. शेवटी ठेकेदाराला सांगितले की मुश्रीफ साहेबांना जाऊन भेटा. वारंवार विनंती करूनही ठरलेल्या ठेकेदाराच्या इशाऱ्यावर विभागाचे अधिकारी काम करत आहेत, अशी जमादार यांची तक्रार आहे.
ही बाब त्यांनी बुधवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कानावर घातल्यानंतर केसरकर यांनी संजय पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. येथे जोतिबा विकास आराखड्याची बैठक संपल्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर केसरकर यांनी पाटील कमी रकमेची निविदा मंजूर झाली आहे ना मग त्यांना वर्क ऑर्डर देऊन टाका, मी मुश्रीफ साहेबांशी बोलतो असे दोन तीन वेळा सांगितले. मात्र पाटील यांनी नकारघंटा वाजवली.
दालनाबाहेर आल्यानंतर त्यांचा हाच पवित्रा असल्याने जमादार व पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. निविदा प्रक्रियेत कोणतीही चूक नसताना काम का अडवले, अशी विचारणा केली. येथे झालेल्या वादावादीनंतर विभागाने काही मिनिटांतच ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली.
वाद कशासाठी..?रस्त्याचे नाव : गडहिंग्लज भैरी देवालय आलूरपासून बेरडवाडी, हणबरवाडी ते बेलेवाडी काळम्मा रस्त्याचे सुमारे १० किलोमीटरचे काम, लहान पूल आणि आरसीसी गटर्सरक्कम : २ कोटीमंजुरीसाठी प्रयत्न : खासदार संजय मंडलिकमंडलिक यांचा ठेकेदार : भंडारीमुश्रीफ यांचा आग्रह : राजू इनामदार
समर्थकच करू लागले आरोप...उपमुख्यमंत्री पवार यांचा गट सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री शिंदे गट बचावात्मक पवित्र्यात गेला आहे. त्यात पवार हे धडाधड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही खात्याच्या बैठका घेऊ लागले आहेत. त्यामुळे भाजप-शिंदे गटात अस्वस्थता असून ती आता जिल्हास्तरांपर्यंत पाझरू लागली आहे. राजेखान जमादार हे एकेकाळचे मुश्रीफ यांचेच खंदे समर्थक. तेच आता त्यांच्याविरुद्ध जाहीर आरोप करू लागले आहेत. त्यातून तालुक्याच्या राजकारणात मुश्रीफ-मंडलिक गटात आलबेल नसल्याचेच चित्र दिसते.