कोल्हापूर : देशावर अदानी आणि अंबानी राज्य करतात आणि जिल्ह्यात दोन नवे अदानी अंबानी सर्व सत्ता आपल्याकडेच राहील यासाठी झटत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा अशी बोचरी टीका खासदार संजय मंडलिक यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. गेली सहा वर्षे स्वच्छ कारभार आहे तर शपथा, टोकण कशाला, सरळपणे निवडून येऊन दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले.
ते आपल्या सत्तेचा संबंध आला तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात. सत्तेच्या आणि पैशाच्या माध्यमातून सर्व सूरु आहे. जमलं नाही तर आपल्या पध्दतीने वेगळी मोट बांधतात, हे समजण्याइतका मतदार आता दूधखुळा राहिलेला नाही असा इशाराही मंडलीक यांनी यावेळी दिला.जिल्हा बॅंकेतील शिवसेना प्रणित शाहू परिवर्तन विकास या विरोधी आघाडीचा करवीर, पन्हाळा, गगनबावडा, कोल्हापूर शहर यांचा संयुक्त प्रचार मेळावा कळंबा येथील अमृतसिध्दी हॉलमध्ये झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते. माजी आमदार चंद्रकांत नरके यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते.कोल्हापूर जिल्हा बँकेत शिवसेना आणि सत्तारूढ गट अशी दुरंगी लढत होत आहे. जागा वाटपात तडजोड न झाल्याने महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. अन् निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेना पुर्ण विराम मिळाला. यानंतर दोन्ही आघाडीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. या प्रचारसभेतून आता नेत्यांनी एकमेकांवर टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. मंडलिक म्हणाले, बॅंक एकट्या कुणामुळे फायद्यात आली नाही, त्याला सर्वांचा हातभार लागला. मुश्रीफांनी एकमुखी कारभार केला, पण त्यांना बळ देणाऱ्यात आम्हीही होतो, याचा त्यांना विसर पडल्याची खंत आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवले असे सांगता, मग जिल्हा परिषद, गोकूळला का तसे केले नाही. जोडे बाजूला ठेवण्याच्या नादात बॅंकेतून बाहेर येताना भाजपचे जोडे घालून येणार का असा तिखट सवालही मंडलीक यांनी केला.यावेळी अध्यक्षस्थानावर बोलताना माजी आमदार संपतराव पवार यांनी सत्ताधाऱ्यावर टिका केली. तर माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, पी.जी.शिंदे, शहाजी कांबळे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकूळ संचालक अजित नरके, एस.आर.पाटील, विजय देवणे, शुभांगी पोवार, अशोक पवार पाटील, बाबासो देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.