कोल्हापूर : सहकारात काम करताना सगळ्यांशी मैत्रीचे संबंध ठेवावे लागतात. सगळेच मित्र करत गेलो, आणि मित्र करता करता लोकांना असे वाटायला लागले. यांच्यात काही दम नाही. लोकसभेच्या काळात ‘आमचं ठरलयं’ एक स्लोगन होते, त्याचे त्यांनी पेटंट केले आहे. आम्ही काय त्यातून बाजूला झालेलो नाही, फक्त या निवडणुकीपासून ‘आमचं नवीन ठरलयं’ आणि जे ठरलयं ते टाेकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करु. असा इशारा खासदार संजय मंडलिक यांनी दिला.
जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार रविवारी शासकीय विश्रामगृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. मंडलिक म्हणाले, बँकेची निवडणूक संस्थेपुरती मर्यादित नव्हती, त्यामध्ये असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची निवडणूक होती. यामध्ये सगळ्यांनी बळ दिले, ही शिदोरी आगामी काळात उपयुक्त ठरणार आहे. सहकारातील दोन-चार निवडणुका लढवणे व जिंकण्यासाठी नाही तर ‘माजी’ पुसून सहा जणांना आमदार करण्याचा निश्चय केला असून त्यानुसार भक्कम बांधणी करु.
ताकद नव्हती तर, ‘गोकुळ’मध्ये सहा संचालक कसे?
शिवसेनेची सहकारात ताकद नसल्याने जिल्हा बँकेला दोन जागांवर बोळवणीचा प्रयत्न झाला. आमची ताकद नव्हती तर, ‘गोकुळ’मध्ये सहा जागा दिल्या कशा?, अशी विचारणा मंडलिक यांनी केली.
आणि कोल्हापुरात महाभारत घडले
आम्ही तीन जागा मागत होतो, मात्र ते दोन जागांवर ठाम राहिले. महाभारतात असाच प्रसंग येऊन गेला, आम्हाला सगळे राज्य नको, किमान ‘हस्तिनापूर’ तरी द्या, अशी मागणी पांडवांनी कौरवांकडे केली होती. त्यावेळी सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन मिळणार नाही, असे कौरवांनी सांगितले आणि महाभारत घडले. तिसरी जागा देत नाहीत म्हटल्यावर कोल्हापुरात महाभारत घडले आणि त्यात विजयी झाल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
पराभूत नव्हे लढाऊ उमेदवार
क्रांतिसिंह पवार, उत्तम कांबळे, रेखा कुराडे, लतिका शिंदे, रवींद्र मडके, विश्वास जाधव यांनी मते चांगली घेतली. ते पराभूत नव्हे तर, लढाऊ उमेदवार असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
बाबासाहेबांनी राष्ट्रवादीतच रहावे
बाबासाहेब शिवसेनेत कधी प्रवेश करता, असे सुनील मोदी यांनी विचारले. यावर पाटील १९९० पासून शिवसेनेच्या प्रचारात आहेत, प्रत्येकाची काहीतरी अडचण असते. त्यांनी शिवबंधन घालू नये, राष्ट्रवादीतच रहावे, असे सत्यजीत पाटील यांनी सांगितले.