-पोपट पवार
काेल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार हे पहिल्यांदाच २५ ऑगस्टला कोल्हापुरात येत आहेत. या दिवशी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात त्यांची सायंकाळी ४ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती असणार आहेत. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून बाइक रॅलीद्वारे पवार यांचे शाहू नगरीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
खा. पवार यांचे एकेकाळचे शिलेदार वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पवार यांची साथ सोडली आहे. या पार्श्वभूमीवर ते यावर काय भाष्य करणार याची उत्सुकता आहे. कोल्हापूर जिल्हा हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिला आहे.
जिल्हा बँक, सहकारी कारखाने यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांवर या पक्षाची पकड आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गत महिन्यात बंडखोरी केल्याने पक्षाची दोन शकले झाली. यात जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केल्याने पवार गट खिळखिळा झाला. सध्या व्ही.बी. पाटील, आर. के. पोवार, माजी आमदार राजू आवळे यांच्यावर जिल्ह्यातील पवार गटाची धुरा आहे. खा.पवार यांच्या नियोजित दौऱ्याच्या नियोजनासाठी बुधवारी जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.