संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गाकरिता घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीतील तांत्रिक चुकांसंदर्भात मॅटमध्ये सुनावणी सुरू असतानाच आयोगाने स्वत:च्या मर्जीच्या निकषावर गेल्या आठवड्यात घाईघाईत निकाल जाहीर केला. याचा फटका हजारो गुणवत्ताधारक उमेदवारांना बसला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २३ मार्चच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील मंत्रालयीन लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या संवर्गासाठी १३०० जागांसाठी पात्र ठरलेल्या ३००३ उमेदवारांसाठी ७ एप्रिल ३००३ उमेदवारांसाठी मुंबईतील केंद्रावर कौशल्य चाचणी घेतली. या चाचणीदरम्यान तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे उमेदवारांनी आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने १२ आणि १३ एप्रिल रोजी 'संभ्रम टंकलेखन चाचणीचा' या मालिकेद्वारे प्रकाश टाकला होता. यानंतर तब्बल ७० उमेदवारांनी १५ एप्रिल रोजी मॅटमध्ये तक्रार दिली होती. दरम्यान, आयोगाने तक्रारीची दखल घेऊन ३१ मे या दिवशी ही चाचणी पुन्हा घेतली, त्यातही असंख्य त्रुटी झाल्याची तक्रार उमेदवारांनी केली होती.हे उमेदवार ३ एप्रिल २०२२ रोजी पूर्व परीक्षा आणि ६ ऑक्टोबर २०२२ रोजी मुख्य परीक्षा पात्र ठरले आहेत. या परीक्षेला बसलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी पुन्हा तांत्रिक समस्या आणि अमर्यादित उतारा टंकलेखनासाठी दिल्याबद्दल १५ एप्रिलला मॅटमध्ये तक्रार दिली होती. याबाबत २८ जुलै रोजी सुनावणी होणार असतानाच तत्पूर्वीच आयोगाने या चाचणीचा निकाल ११ जुलै रोजी घाईघाईत घोषित केला. यात आयोगाने स्वत:चाच निकष डावलून निकाल लावल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे.निकष चुकीचा
- आयोगाने लिपिक, टंकलेखक परीक्षा अंतिम टप्प्यावर असताना स्वत:च काढलेल्या अधिसूचनेच्या विरुद्ध जावून मनमानी करत चुकीच्या निकषावर हा निकाल जाहीर केला आहे. याचा हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे. या निकालामुळे अनेकांना प्रचंड धक्का बसला आहे.
- ज्या निकषावर आयोगाने हा निकाल लावला, तो यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या एकाही अधिसूचनेत नसताना हा बदल ऐनवेळी करून उमेदवारांना फटका दिला आहे. हा निकाल कोणाच्या भल्यासाठी लावला, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे.
अमर्यादित उताऱ्याबाबत लेखी आक्षेप७ एप्रिल आणि ३१ मे या दिवशी घेण्यात आलेल्या या चाचणीसाठी दिलेल्या अमर्यादित उताऱ्याबाबत उमेदवारांनी आयोगाकडे ३१ मे या चाचणीच्या दिवशीच ई-मेल आणि लेखी पत्राने आक्षेप घेतला आहे.